महामार्गावर भरधाव डंपरने घेतला तरुणीचा बळी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राष्ट्रीय महामार्गावर आज भरधाव डंपरने पुन्हा एक बळी घेतला आहे. मोपेडला दिलेल्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली तर तिचा भाऊ हा थोडक्यात बचावला आहे.

शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवर बसलेल्या तरुणीचा जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. जळगावकडून धुळ्याकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ३३११) हा शिव कॉलनी कडून रेल्वे उड्डाणपुलाकडे जात होता. त्यावेळेस पुढे जाणारी मोपेड दुचाकी (एमएच १९ सी ७१६९) याला डंपरने मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेल्या मनस्वी उर्फ ताऊ सुभाष सोनवणे (२०) रा. खोटे नगर, जळगाव या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तरुणीचा भाऊ नचिकेत सुभाष सोनवणे (२५) रा. खोटे नगर, जळगाव हा थोडक्यात बचावला आहे.

ही दुर्घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान रामानंदनगर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.