छत्तीसगडमध्ये भीषण अपघात ; ११ जणांचा मृत्यू

0

रायपूर , लोकशाही न्यूज नेटवर्क
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात झाला. त्यात ११ जण ठार झाले असून, १० पेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालोदाबाजार जिल्ह्यातील भाटापारा येथे हा अपघात झाला. भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. येथे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त करताना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, 11 जण यामध्ये जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. यातील दोन गंभीर जखमींना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले.

साहू कुटुंबातील सदस्य एका घरगुती कार्यक्रमात सहभागी होऊन खिलोरा येथून अर्जुनी येथील त्यांच्या घरी परतत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. खमारियाजवळ एका ट्रकने त्यांच्या पिकअप वाहनाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. सात जणांचे मृतदेह भाटापारा पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये आणण्यात आले आहेत. चार मृतदेह बालोदाबाजार पोस्टमॉर्टेम हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.