अपघात आणि प्रथमोपचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अपघात (Accident) या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा ‘अपघात’ या शब्दाचा सामान्य अर्थ होतो. आत्महत्या व खुनाच्या प्रयत्नातून निर्माण होणारे आजार व जखमाही अपघात या सदरात घातले पाहिजेत.

आपल्या देशातल्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे दहा टक्के मृत्यू अपघातांमुळे होतात. यात बुडित मृत्यू, रस्त्यावर अपघाती मृत्यू. भाजणे, विषबाधा ही महत्त्वाची कारणे आहेत. अपघातात मरणा-यांमध्ये मुख्यतः तरुण आणि लहान मुले यांचा समावेश असतो. बुडित मृत्यूंमध्ये तरुण स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. भाजण्याच्या घटनांतही स्त्रियाच जास्त प्रमाणात बळी जातात.

रस्त्यावरच्या अपघातांमध्ये मरणा-यांपेक्षा नुसते जखमी होणा-यांचे प्रमाण पंधरापट आहे. अपघातांमधून वाचलेल्या अशा व्यक्तींमध्ये काही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन परिणाम राहतात. उदा. भाजलेल्या व्यक्तीस पुढे त्वचा, स्नायू आखडून व्यंग तयार होणे, अपघातामध्ये हात-पाय, डोळे जाणे, इत्यादी. मृत्यूबरोबर अशा प्रकारच्या दीर्घकालीन दुष्परिणामांची दखल घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

रस्त्यावरच्या आणि कारखान्यांतल्या अपघातांच्या अनेक घटनांमध्ये मानवी चूक (म्हणजे अपघातामध्ये सापडलेल्या व्यक्तीची चूक) आहे असे वरवर दिसते. पण खोलवर विचार केला तर हे खरे नसते. अशी कारणमीमांसा देऊन शासन आणि कारखान्यांचे व्यवस्थापन जबाबदारीतून सुटू पाहते. आपण नेहमीचे रस्त्यावरच्या अपघातांचे उदाहरण घेऊया. रस्त्यावरचा अपघात हा एक अगदी गंभीर आणि गुंतागुंतीचा मामला आहे. कारणांची यादी अशी काढता येईल

 

रस्त्यावरच्या अपघाताची कारणे

• खराब अरुंद रस्ते, त्या मानाने वाहनांची संख्या बेसुमार,

• वाहतूकनियंत्रक यंत्रणा अकार्यक्षम असणे, खराब वाहने (फार जुनी, दुरुस्त्या न करणे, इ. ),

• सार्वजनिक दळणवळणाच्या सोयी पुरेशा नसणे (यामुळे लोक ट्रक, ट्रॅक्टर, टँकरमधून प्रवास करतात).

• वाहनचालक मद्यपी असणे (याला शासन, प्रशासनही काही प्रमाणात जबाबदार आहे),

• वाहनचालकांच्या चुका (अतिवेगाने वाहन चालवणे, समोरच्या वाहनांवर प्रखर प्रकाशझोत टाकणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, परवानगी नसताना माणसे कोंबणे, इ. ) आणि

• काही अनपेक्षित घटना (उदा. चालत्या वाहनावर फांदी मोडून पडणे, अचानक दरड कोसळणे, रस्त्यावर तेल सांडलेले असणे, इत्यादी. )

या कारणांची यादी लक्षात न घेता केवळ चालकाला दोष देणे योग्य होणार नाही. बहुतांश अपघातांना आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी असते आणि अपघातांची स्वतःची काही वस्तुस्थिती असते.

प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाणात असू शकते. काही अपघात किरकोळ म्हणून प्रथमोपचार करण्यासारखे असतात. पण धोका दिसत असेल तर योग्यतो प्रथमोपचार करून ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक असते. वेळीच मिळालेला प्रथमोपचार अगदी लाख मोलाचा ठरू शकतो. म्हणूनच या निवडक अपघातांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.