कारचा भीषण अपघात; ७ विद्यार्थी ठार; मृतांमध्ये भाजप आमदाराचा मुलगा

0

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क

वर्ध्यात काल रात्री भीषण अपघात झाला आहे. वर्ध्यातील सेलचुरा गावाजवळ हा अपघात झाला असून, या अपघातात एक कार थेट दरीत कोसळली. रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यू झालेले तरुण हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचंही प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे.

रात्रीच्या वेळी जंगली श्वापदं वाहनासमोर आल्यानं वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरीत ही कार कोसळली. मृतांमध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा पूत्र अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे. मृतांमध्ये निरज चव्हान (वय २२, रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश), अविष्कार विजय रहागडाले (वय २१, रा. गोंदिया), नितेशसिंग (वय २५, रा. राज्य ओडीसा), विवेक नंदन (वय २३, रा. गया बिहार) आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग (वय २३, रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश), शुभम जयस्वाल (वय २३, रा. दिनदयाल उपाध्याथ नगर, उत्तरप्रदेश), पवनशक्ती (वय १९, रा.गया बिहार) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

 

अविष्कार रहांगडाले

तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांना तो एकुलता एक मुलगा होता. अविष्कारने दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदियाच्या मनोहरभाई पटेल सैनिकी विद्यालयात घेतले होते. पदवीपर्यंतचे शिक्षणही जिल्ह्यातूनच झाले. सध्या तो वर्धा येथील दत्ता मेघे मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. अविष्कारच्या मृत्यूची माहिती मिळताच संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. दुपारी मृतदेह आणल्यानंतर स्वगावी खमारी येथील स्मशानभूमीत अविस्कारच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.