चोर ते चोर शिरजोर ! वाळूचोर…!

0

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये ! हे अगदी खरे आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या वाळू चोरीचा मामला जोरात सुरु आहे. वाळू चोरांना खालपासून ते वरपर्यंत सरंक्षण मिळतेय हे दुर्दैव होय. नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणे, अवैध उपसा केलेल्या वाळूची वाहतुक करणे, अवैध वाळूची वाहतूक कालबाह्य वाहनांमधून करणे ते कालबाह्य वाहन अवैध वाळू महसूल खात्याने पकडले तेव्हा 3 ब्रास वाळू असतांना 1 ब्रास वाळू असल्याचा पंचनामा करणे त्यानंतर कालबाह्य डंपर वाहनाची नंबरप्लेट बदलून ते जप्तचे वाहन दाखवणे याचा अर्थ चोर ते चोर वरुन शिरजोर म्हणजे एकचोरी लपवण्यासाठी अनेक चोऱ्या करायच्या आणि आम्ही चोर नाही असे भासवायचे.

बेकायदा कृत्य करणाऱ्यांना कायद्याची भिती वाटतच नाही याचे कारण काय? याचे एकमेव कारण म्हणजे आमची भ्रष्ट प्रशासन यंत्रणा होय. दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी बोदवडचे तहसिलदार योगेश टोम्पेंनी जळगावहून वाळूची चोरी करणारे डंपर पकडले. पकडलेल्या डंपरचा नंबर एम.एच.19 वाय.4464 असा नंबर होता हाच नंबर तहसिलच्या दस्तऐवजामध्ये नोंदलेला आहे. परंतु आर.टी.ओ. कार्यालयात मात्र सदर डंपरचा नंबर एम.एच.19.झेड 3636 असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बनवा बनवी करण्यामागचे कारण काय? तर पकडलेला अवैध वाळू वाहणारा डंपर धनदांडग्याच्या नावाचा आहे. म्हणजे स्वतःवरचे संकट दुसऱ्याच्या नावावर थोपविण्याचा प्रकार म्हणता येईल. म्हणजे बेकायदा वाळूची चोरी केली त्यावर वाहन बदलण्याचे बेकायदा कृत्य केले. अशा प्रकारे दिवसा ढवळ्या चोरी करणाऱ्यांना सफेद चोर या नावाने संबोधले जातात. कारण चोरी करणारे चोरटे पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करतात. त्यांना पकडले जाते. त्याचेवर कायदेशिर कारवाई करून त्यांना कारागृहात पाठवले जाते. संबंधित गुन्ह्यांतर्गत त्यांना शिक्षाही होते. परंतु अशा प्रकारे दिवसा-ढवळ्या करोडो रुपयांच्या वाळूची चोरी करणारे भ्रष्ट प्रशासन यंत्रणेला हाताशी धरुन त्यांना चिरीमिरी देवून स्वतःचे उखळ पांढरे करतात. अशा प्रकारची जमात सध्या राज्यात देशात वावरत आहे. या जमातीला आमचे राजकीय नेते आश्रय देतात. त्याचे कारण सांगण्याची आवश्‍यकता नाही.

प्रशासनाकडे याबाबत कोणी तक्रार केली नसती तर हा प्रकार उघडकीसही आला नसता. परंतु संबंधित वाळूचोरीच्या डंपर मालकाच्या दुर्देवाने हा प्रकार उघडकीस आला आणि त्यांचे बिंग फुटले. परंतु अशा सफेद चोरांना कसलाही स्वाभीमान अथवा प्रतिष्ठा नसते. उलट ते उजळ माथ्याने समाजात वावरतात. पैसा सबकुछ है. पैशाने सर्व काही करू शकतो. असे त्यांना वाटते आणि ते खरेसुध्दा आहे. मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांच्या तसेच राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसलेले असतात.

जळगावहून वाळूची चोरी करून ते अवैध वाहतूक करणारे बोदवड तहसिलदारांनी पकडले. त्याबद्दल तहसिलदारांचे कौतुक केले पाहिजे. परंतु सदर डंपरमध्ये 3 ब्रास वाळू असतांना 1 ब्रास वाळू असल्याचा पंचनामा करण्याचे घाट घालत असतांनाच त्या डंपरमध्ये 3 ब्रास वाळू असल्याची तक्रार जातात. तीन ब्रासची नोंद झाली अन्यथा एक ब्रासचीच नोंद झाली असती. याचा अर्थ प्रत्येक बाबतीत या सफेद चोरांचे गुन्हेगारी कृत्य वाचवण्यासारखे म्हटले पाहिजे. चोरीच्या वाळूच्या डंपरला पकडल्यानंतर त्यांचे नंबरप्लेट मूळमालकांनी बदलल्याचे वृत्त वाऱ्यासारखे जळगाव जिल्ह्यात पसरले. सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ही बातमी व्हायरल झाली. त्यामुळे चोरीच्या वाळूची वाहतूक ज्या डंपरने केली ते डंपर कोणाचे ? याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले. याबाबत आरटीआय कार्यकर्ते दीपककुमार गुप्तांनी डंपर मालकाची माहिती काढली.

माध्यमाशी बोलतांना त्यांनी सांगितले की, सदरचे पकडलेले डंपर आदित्य खटोड यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. हे नाव व्हायरल होताच अनेकांना धक्का बसला. परंतु हे सत्य आहे. यापूर्वीसुध्दा हेच डंपर चोरीची वाळूची वाहतूक करतांना पकडले होते. त्यावेळी दंड भरुन मोकळे झाले म्हणतात. हे सत्य असेल आदित्य खटोड यांचा वाळू चोरीचा सराईत व्यवसाय आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. याची कसून चौकशी झाली पाहिजे. सध्या भाजपचे खा.उन्मेश पाटील यांनी गिरणा नदीच्या संवर्धनासाठी गिरणा परिक्रमा करताहेत गिरणा परिक्रमा चालू असतांना अशा प्रकारे वाळूची चोरी होते हे एक प्रशासनापुढे आव्हानच म्हणता येईल. अवैध वाळू उपशासंदर्भात खासदार आणि पालकमंत्री यांच्यातला वाद रंगला होता. आता पालकमंत्र्यांकडून याची कसून चौकशी होईल का? याबाबत जनतेत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.