खा.ए.टी.पाटलांच्या वक्तव्याने भाजपतील गटबाजी उघड!

0

चांगभल 

धों. ज. गुरव (मो.9527003891)

जळगाव येथे पासपोर्ट कार्यालयाचे बुधवारी खा.ए.टी.नाना पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली. तर शिवसेना या मित्रपक्षाची अनुपस्थिती सर्वांनी खटकली. जळगाव जिल्हातील भाजपात माजी मंत्री एकनराथराव खडसे व जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे सरळसरळ दोन गट आहेत. या कार्यक्रमाला जळगावचे आ.सुरेश भोळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. परंतु जळगावचेच विधान परिषद सदस्य आ.चंदुभाई पटेल व आ.स्मिताताई वाघ यांची अनुपस्थिती मात्र जाणवली. उद्घाटन सोहळ्याची जी निमंत्रण पत्रिका होती. त्यात आ.चंदुभाई पटेल आणि आ.स्मिताताई वाघ यांचा प्रमुख अतिथीमध्ये नावे न छापता त्यांना का डावळले हे कळले नाही. जळगावचे प्रथम नागरीक महापौर ललित कोल्हे हे कोणत्याही पक्षाचे असले तरी प्रथम नागरीक म्हणून त्यांनाही पत्रिकेत स्थान मिळायला हवे होते. अशी कुजबुज ऐकायला मिळाली. चंदुभाई पटेल व स्मिताताई वाघ या भाजप आमदारांची नावे गाळण्या मागचे कारण म्हणजे भाजपतील गटबाजीच होय असे समारंभस्थळी बोलले जात होते. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचे असलेले सहकार राज्यमंत्री शिवसेनेचे ना.गुलाबराव पाटील यांनाही निमंत्रण पत्रिकेत स्थान दिले गेलेले नाही. गुलाबराव पाटील हे बुधवारी जळगाव जिल्ह्यातच असतांना त्याचें कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने ते उपस्थित नव्हते. त्याचा परिणाम शिवसेनेचे शहरातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. एकदंरित केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात राजकीय गटबाजी दिसून आली. त्यातच खा.ए.टी.नाना पाटील यांनी आपल्या भाषणात जे वक्तव्य केले. त्या वक्तव्यामुळे भाजपतील गटबाजी आणखीन उघड झाली.
खा.ए.टी.नाना पाटील यांच्या वक्तव्यात केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचेवर टिका करण्याचे काही औचित्यच नव्हते. त्याच बरोबर मी सतत दोन वेळा लोकसभेवर निवडून आलो आणि 2014 सालच्या निवडणूकीत राज्यात दुसर्‍या क्रमांकाच्या मत्ताधिक्याने तर देशात चौथ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलो असतांना सुध्दा मी मंत्री होवू शकलो नाही. परंतु ज्यांचा एकदा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला आणि दुसर्‍यांदा कमी मताधिक्यानी विजयी झाले. ते मात्र (डॉ.सुभाष भामरे यांचे नाव न घेता) केंद्रात मंत्री झाले.हेे खा.ए.टी.पाटलांचे वक्तव्य म्हणजे स्वतःविषयीची दर्पोक्ती ती दिसून आली. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत देशात मोदींची लाट होती. त्यात अनेकजण या लाटेत विजयी झाले. त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाते. केंद्रात मंत्री करण्याचा सर्वस्वी अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. मंत्री पदासाठी निवड करतांना मोदींनी जे निकष लावले हे पंतप्रधान म्हणून तेच सांगू शकतील तथापि, सर्वांधिक मत्ताधिक्याने निवडूण आलो असतांना मंत्री होवू शकलो नाही. हे खा.ए.टी.पाटील यांचे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अविश्‍वास दाखविण्याचा प्रकार नाही का डॉ.सुभाष भामरे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे कार्यकर्ते होय. शिवसेनेच्यावतीने निवडणूकीत ते पराभूत झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी भामरेंनी भाजपत प्रवेश केला. आणि निवडूण आल्यानंतर ते मंत्री झाले. आपल्या लगतच्या धुळे जिल्ह्यातील डॉ.भामरे केंद्रात सरंक्षण राज्यमंत्री झाले. त्याचा उपयोग आपण कशापध्दतीने करून घ्यायला पाहिजे. ते कौशल्य वापरून खा.ए.टी.नाना यांनी करून घेण्याऐवजी मला मंत्रीपद मिळाले नाही, अशी खंत त्यांनी का केली हेच कळत नाही.
केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमत असतांना आपल्या भागातील विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्रीच असण्याची गरज काय खासदाराकडून विकासकामे होवू शकत नाही का जळगाव जिल्ह्याचे केंद्राच्या अखत्यारितील असलेले विविध प्रश्‍न सोडवून विकास साधणे शक्य नाही का, मराठवाड्यासारख्या मागासभागात असलेल्या लातूर सारख्या ठिकाणी रेल्वेचे डब्बे बनविण्याचा प्रकल्प तेथे सुरु झाला असा एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी खा.ए.टी.नाना पाटील यांनी प्रयत्न केले तर जळगावची जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. जळगाव जिल्ह्यातील शेती सुपिक असून तेथील मुख्य पिके केळी, कापूस, उस ही आहेत. केळी उत्पादनात जळगाव जिल्हा एकेकाळी देशात अव्वल असतांना आता तो मागे का पडला याचे आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जिथे केळी पिकत नव्हती, ते गुजरात राज्य जळगावच्या कितीतरी पुढे गेले आहे. जळगावला अद्यावत केळी संशोधन केंद्राचे भिजत घोंगडे पडून आहे. केळीला फळाचा दर्जा मिळावा म्हणून केळी उत्पादक शेतकरी यांची मागणी लक्षात घेवून तो मिळविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. ते झाले नाही. दुध उत्पादनात जळगाव जिल्हा एकेकाळी अव्वल असल्याने दुधाचा महापुर योजनेत जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संस्था निर्माण झाली. परंतु राजकारणामुळे पुढे त्या संस्थेचा बोजवारा उडाला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. आ.एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नामुळे आता थोडी दुध संघाला उर्जीत अवस्था आली आहे. विकास कामे करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. जळगाव शहरातून जाणारा महामार्ग मृत्यू मार्ग बनलेला असतांना गेल्या वर्षभरापासून समांतर रस्त्याचा प्रश्‍न सुटत नाही, गेल्या सहा महिन्यापूर्वी केंद्राकडून शंभर कोटी रूपये मंजुर झाले. तथापि, डिपीआर मंजुरीअभावी अद्याप त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्याला गती देण्याचे काम खा.ए.टी.नाना पाटील यांनी केले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत, अशावेळी मी मंत्री असतो तर …… असे म्हणून चालेल काय, निवडणूकीत जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.