स्वार्थासाठी स्वकियांना अडचणीत आणणाऱ्यांनी निष्ठा शिकवू नये!

0

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा उदय वाघ यांना टोला

जळगाव | प्रतिनिधी

गुलाबरावांचे दुखतं कुठे म्हणणाऱ्या भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून संपूर्ण राज्यात संकटमोचक म्हणून प्रतिमा असलेल्या ना.गिरीश महाजन यांच्यासमोर गावगुंडासारखी हाणमारी करणाऱ्या उदय वाघ यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. गुलाबरावांच्या दुखण्यावर बोलण्या आधी तुम्हाला घरी का बसावे लागले याचा विचार करावा.गुलाबराव कुणाचे बोट धरून राजकारणात आलेले नाही. नाथाभाऊंच्या कृपेने राजकीय शिखर गाठणाऱ्या उदय वाघ तुमचे कर्तृत्व काय? असा थेट सवाल राजेंद्र महाजन यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांनी शिवसेनेची व्यथा मांडण्यासाठी पंतप्रधानांच्या सभेत बोलण्याची मागणी केली होती. गिरिशभाऊ पालक आहेत, म्हणूनच पालकाकडे गुलाबभाऊंनी हट्ट धरला यात गैरकाय? ना.महाजन यांनी नाही म्हटल्यावर एका शब्दात गुलाबभाऊंनी ऐकून घेतले आणि व्यासपिठावर सन्मानाने विराजमान झाले. तुमच्या सारख्या व्यासपिठावर ना.महाजन असतांना मारामाऱ्या केल्या नाहीत. वडिलांच्या वयाचे असलेल्या आपल्याच पक्षाचे तीन टर्म आमदार, जिल्हाध्यक्ष राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करतांनाचे चित्रीकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. तुमच्या या कृत्याची बरोबरी गुलाबभाऊंना करताच येणार नाही. म्हणूनच पंतप्रधानां सोबत गुलाबभाऊ सन्मानाने व्यासपिठावर विराजमान झाले आणि तुम्हाला मात्र, व्यासपिठाच्या परिसरातही का घुसू दिले नाही? याचे आत्मचिंतन करावे असा सल्लाही राजेंद्र महाजन यांनी उदय वाघ यांना दिला आहे.

निवडणूक कशी लढायची ही तुम्ही गुलाबरावांना शिकवू नका. दांडगाईकी, हाणामाऱ्या, खंडणी वसूली केली नाही म्हणूनच गुलाबभाऊ तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले. याउलट कर्तृत्ववान असलेल्या आ.स्मिताताई वाघ यांना लोकसभेची मिळालेली उमेदवारी तुमच्या कर्तृत्वामुळेच रद्द झाली हा इतिहास विसरू नका. लोकसभा निवडणूकीत कुणी प्रामाणिक काम केले? कोण घरी बसून पक्षविरोधी काम करीत होता? शिवसेनेने युती धर्माचे पालन केले की नाही हे तुमच्याच पक्षाच्या खासदारांना जाहीर व्यासपिठावर विचारा. गद्दारी कुणी केली हे त्यांनी सांगितले आपल्या दोघांपैकी एकाने सार्वजनीक जिवनातून निवृत्ती घेणार का? असे जाहीर आव्हान राजेंद्र महाजन यांनी उदय वाघ यांना दिले आहे.
मुक्ताईनगरातील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या पदाचा राजिनामा देवून बंडखोरी केली. ही धमक तुमच्यात हिंम्मत असले तर फ क्त शिवसैनिकच दाखवू शकतो. त्यांचा आदर्श घेवून तुमच्या बगलबच्च्यांना आधी पक्षाने दिलेल्या पदांचा राजिनामा देण्यास सांगा आणि मग हिंम्मत असले तर गुलाबरावांसोबत लढून दाखवा असेही श्री.महाजन यांनी म्हटले आहे.
आमचा संघर्ष भाजपाशी नाही. किंवा बंडखोरांना आम्ही घाबरतही नाही. बंडखोर उमेदवारामध्ये अपक्ष लढण्याची हिंम्मत नाही. म्हणूनच भाजपाचे ध्वज आणि नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर करून ते शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुलाबराव पराभवाच्या भितीने नव्हे तर भाजपा आणि त्यांच्या सन्माननीय नेत्यांचा जोशात असलेल्या शिवसैनिकांकडून गैरसमजूतीतून अवमान होवू नये यासाठी गुलाबरावांचा आग्रह होता असा दावा राजेंद्र महाजन यांनी केला आहे. भाजपाचे नेते, निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेने सोबतच आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: बंडखोरांना त्यांची जागा दाखविली आहे. मुख्यमंत्र्यांपेक्षाही उदय वाघ आपण मोठे झाला आहात काय? असा सवालही राजेंद्र महाजन यांनी शेवटी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.