सावधान.. भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव; आरोग्य मंत्रालयाची माहिती

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जगभरात करोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे.

कारण भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना देशात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि अफ्रिकेतील इतर काही देशांमध्ये आढळलेला हा करोनाचा नवा व्हेरिएंट भारतापासून अद्याप दूर असल्याचा दिलासा देशवासीयांना मिळाला होता.

मात्र, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.