समुद्रात जहाजाला आग; इंजिनही पडले बंद, 709 जण बचावले

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोची आणि लक्षद्वीपच्या बेटांदरम्यान धावणाऱ्या एका प्रवासी जहाजाला आग लागल्याची घटना घडली आहे.

जहाजाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्यामुळे जहाज भर समुद्रात बंद पडले. ही घटना घडली तेव्हा जहाजावर 709 जण उपस्थित होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बचवा पथक तिथे पोहचले आणि सर्वांची सुटका केली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

कोची आणि लक्षद्वीप बेटांदरम्यान धावणाऱ्या ‘एमव्ही कवरत्ती’ जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलाने सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांची सुखरूप सुटका केली. ही आग जहाजाच्या इंजिन रूममध्ये लागल्याने जहाज भर समुद्रात बंद पडले होते. घटनेच्या वेळी यात 624 प्रवासी आणि 85 क्रू मेंबर्स होते. समुद्राच्या उंच लाटांमध्ये ही घटना घडली तेव्हा हे जहाज लक्षद्वीप द्वीपसमूहाचा एक भाग असलेल्या एंड्रोथ बेटाकडे जात होते.

वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, हे जहाज एंड्रोथला जात होते. आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाचे गस्ती जहाज ‘समर्थ’ कवरत्तीमधील प्रवाशांच्या बचावासाठी रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे इंजिन नीट काम करत नव्हते. याशिवाय एमव्ही कवरत्तीवरील वीज पुरवठाही बंद पडला होता. पण, मोठ्या शिताफीने जहाजावरील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. जहाज आता एंड्रोथ येथे पोहोचत आहे, जिथे 274 प्रवाशांना किनाऱ्यावर सोडले जाईल आणि उर्वरित 350 प्रवाशांना कोचीसाठी एमव्ही कोरल या दुसर्‍या जहाजावर पाठवले जाईल. वृत्तानुसार, कोस्ट गार्ड जहाजाने 6.15 वाजता अडकलेल्या जहाजाला दुसऱ्या बाजूला नेण्यास सुरुवात केली आणि आज रात्री 11 वाजेपर्यंत ते किनारपट्टीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. अडकलेल्या जहाजाच्या मदतीसाठी पाठवलेले एमव्ही कोरलही त्याच्यासोबत आहे.

एमव्ही कवरत्ती मंगळवारी कोचीहून लक्षद्वीपसाठी निघाले होते. बुधवारी हे जहाज एंड्रोथ आणि द्वीपसमूहातील इतर बेटांकडे जात असताना ही घटना घडली. जहाज अँड्रोथपासून काही तासांच्या अंतरावर असताना त्याच्या इंजिनला आग लागली. आग तातडीने विझवण्यात आली असली तरी इंजिन बंद करावे लागल्याने जहाज पुढे जाऊ शकले नाही. हे जहाज लक्षद्वीप बेटांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी खास डिझाइन केले गेले आहे. 2008 सुरू झालेले हे जहाज 120 मीटर लांब असून, 700 प्रवासी आणि 200 टन सामान वाहून नेऊ शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.