सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींची तू-तू -मै-मै…!

0

– चांगभल
– धों. ज. गुरव 

गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआय केंद्राचे उदघाटन आणि कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पार पडला. सकाळी 10 वाजता नियोजित या कार्यक्रमास रावेर लोकसभा संघाच्या खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेप्रमाणे सकाळी 10 वाजता खा. रक्षा खडसे,कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. त्यानंतर 10-30 वाजले तरी आ. चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी आले नव्हते . खा.रक्षा खडसेंना पुढचे नियोजित कार्यक्रम असल्याने कार्यक्रम सुरु करण्यात आला.

खा. रक्षा खडसे यांचे भाषण सुरु असताना आ. चंद्रकांत पाटील आले. खा. रक्षा खडसे यांचे भाषण आटोपल्यानंतर आ. चंद्रकांत पाटील म्हणाले सकाळी माझे विविध कार्यक्रम असल्याने मला यायला उशीर झाला. तरी मी येईपर्यंत कार्यक्रम सुरु करायला नको होते. कार्यक्रम सुरू करण्याची एवढी घाई का केली? त्यावर खा. खडसे म्हणाल्या मलासुद्धा यानंतर नियोजित कार्यक्रम असल्याने कार्यक्रम सुरु करावा लागला. व्यासपीठावर होणारा हा दोन लोकप्रतिनिधींमधला वाद कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर तसेच शेतकरी ऐकत होते. माझ्या व्यस्ततेमुळे कार्यक्रमाला मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे सांगून कार्यक्रम सुरु केला. ते योग्यच झाले असे आ. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असते तर उपस्थित लोकांना बरे वाटले असते. हि साधन सूचिता आ.पाटलांनी पाळली असती तर त्यांची शान राहिली असती. परंतु चंद्रकांत पाटलांमधला शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी कार्यक्रम सुरु करण्याची घाई का केली असा जाब त्यांनी विचारला. त्यांची ही दर्पोक्ती कोणालाही आवडली नाही. खा. रक्षा खडसे या केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्या खासदार आहेत. आ. चंद्रकांत पाटील हे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असलेल्या पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे उशीर झाला तरी मी आल्याशिवाय कार्यक्रम सुरु का केला याबाबत पाटलांनी केलेला प्रतिष्ठेचा प्रश्न तेथे उपस्थित कुणालाही भावला नाही. दोन लोकप्रतिनिधींमध्ये व्यासपीठावर सुरु असलेल्या या वादाने मात्र उपस्थितांची करमणूक झाली हे मात्र निश्चित. खा. रक्षा खडसेंची हि खासदारकीची दुसरी टर्म आहे. दोन्ही वेळेला प्रचंड मताधिक्क्याने त्या निवडून आलेल्या आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मतदार संघातील त्यांचे कार्यही चांगले. मतदार संघातील प्रश्न घेऊन सातत्याने ते सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. केळीपिक विम्याचा प्रश्न असो अथवा वीज बिलाचा प्रश्न असो त्या शासनदरबारी प्रश्नासाठी अग्रेसर असतात. बोदवड येथील सीसीआय केंद्राचे उदघाटन आणि कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभ कार्यक्रमाला नियोजित ठरलेल्या वेळेला उपस्थित राहिल्या हि बाब कौतुकास्पद आहे. याबाबत त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कारण राजकीय लोकप्रतिनिधी कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर हजर राहत नाहीत म्हणून जनतेची ओरड असते. आ. चंद्रकांत पाटील यांना सकाळी 10 वाजेच्या आधी कार्यक्रम असतील तर त्या दृष्टीने नियोजन करणे हे त्यांचे काम नव्हे काय? उलट कार्यक्रम सुरु करण्याची घाई का केली ? असा जाब विचारणे हे तेथे उपस्थित असलेल्या कोणालाही आवडलेले नसणार. आ. चंद्रकांत पाटलांच्या आमदारकीची हि पहिली टर्म आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे भाजप यांच्यातील वादाचा फायदा चंद्रकांत पाटलांना मिळाला. त्यांना आमदारकीची लॉटरीच लागली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. रोहिणी खडसेंच्या ठिकाणी एकनाथ खडसे भाजपचे उमेदवार असते तर चित्र वेगळेच राहिले असते. त्यातच राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या खेळीमुळे चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीची तसेच मराठा समाजाची मते मिळाली. कारण राष्ट्रवादीचे उमेदवार अ‍ॅड. रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नसती तर मताच्या विभागणीत रोहिणी खडसेंनी बाजी मारली असती. त्यामुळे काठावर निवडून आलेल्या चंद्रकांत पाटलांनी मतदार संघातील जनतेची मने जिंकायची असतील तर त्यांना मतदार संघासाठी फार काही करावे लागेल. उगाचच प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याचा प्रयत्न करतील तर ते त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

 

मुक्ताईनगर मतदार संघातील त्यांचे पारंपारिक कट्टर समर्थक एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ज्या शरद पवारांच्या आशिर्वादामुळे चंद्रकांत पाटील हे आमदार झाले त्यांनी खडसेंना त्यांच्या पक्षात घेतले आहे. हे चंद्रकांत पाटलांनी ध्यानातघ्यावे. गुरूवारीच बोदवडमध्ये आणखी दोन कार्यक्रम हाते. त्या कार्यक्रमाला एकनाथराव खडसे आणि  आ. चंद्रकांत पाटील हे प्रमुख अतिथी होते. परंतु या दोन्ही कार्यक्रमाला आ. चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले नाहीत. खडसेंच्या उपस्थितीत ते दोन्ही कार्यक्रम पार पडले. आ. चंद्रकांत पाटलांची अनुपस्थिती तेथे सर्वांना खटकली. आमदारकीची संधी मिळालेल्या चंद्रकांत पाटलांनी असे वागू नये असे अनेकांनी बोलून दाखवले. नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटलांकडून असे वागणे बरे नव्हे. त्यांनी आपल्या कर्तृत्वावर लोकांची मने जिंकावित हीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.