संतापजनक.. महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबादमध्ये छेडछाडीची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिला मारहाणकेली आहे. एवढंच नव्हे तर तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावरचे कपडे देखील फाडले आहे. या धक्कादायक घटनेनंतर विवस्त्र झालेल्या महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी आपल्या अंगावरचे कपडे घालायला दिले आहेत. यावेळी काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज परिसरातील बजाज कंपनीच्या गेटजवळ घडली आहे. भर दिवसा रस्त्यावरच हा संतापजनक प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीनं पीडित महिलेला रिक्षातून उतरवत तिच्यासोबत छेडछाड केली आहे. हे प्रकरण एवढ्यावरचं थांबलं नाही तर आरोपीनं तिचे कपडे देखील फाडले आहेत. या घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

पण विवस्त्र झालेली महिला भेदरलेल्या अवस्थेत रस्त्यावर जाताना काही नागरिकांना दिसली. यावेळी रस्त्यावरील नागरिकांनी आपल्या अंगावरील कपडे काढून पीडित महिलेला दिले आहेत. यानंतर पीडित महिला बराच काळ रस्त्यावर बसून रडत होती. रस्त्यावरील अनेकांनी तिच्यासोबत घडलेला प्रकाराबाबत विचारणा केली असता, तिला काहीही सांगता येत नव्हतं. आरोपीनं पीडित महिलेला चावा घेत, तिचं मंगळसूत्र देखील लंपास केल्याचा दावा पीडितेनं संबंधित व्हिडीओत केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.