शेख हसिनांचा स्वागतार्ह विजय

0

बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. काल मतदान झाले आणि कालच लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. तब्बल 80 टक्के जागा जिंकून शेख हसिना यांचे सरकार तेथे लागोपाठ तिसर्‍यांदा सत्तेवर आले आहे. लागोपाठ तिसर्‍यांदा सत्तेवर येणार्‍या शेख हसिना तेथील पहिल्या पंतप्रधान ठरल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेविषयी विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले असले तरी विरोधकांना मिळालेली मते आणि शेख हसिना यांच्या पक्षाला मिळालेली मते पाहता जनमत पूर्णपणे शेख हसिना यांच्याच बाजूने होते हे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. स्वत: शेख हसिना या ज्या मतदारसंघात उभ्या होत्या तेथे त्यांना त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तब्बल एक हजार पटीने अधिक मते मिळाली आहेत.शेख हसिना यांना 2 लाख 29 हजार 539 मते मिळाली आहेत आणि त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी बांगलादेश नॅशनल पार्टीचे एस. एम. जिलानी यांना अवघी 124 मते मिळाली आहेत. व्यक्तिगत लोकप्रियतेचा हा कळस म्हणावा लागेल. संसदेच्या एकूण जागांपैकी त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला 80 टक्क्यांहून अधिक जागा मिळाल्या असल्याने बांगलादेशाला पुढील आणखी पाच वर्ष भक्कम सरकार लाभणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शेख हसिना यांचा हा विजय त्यांची प्रतिमा उजळवून टाकणारा ठरला असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे की, गेल्या निवडणुकीत बांगलोदश नॅशनल पार्टीसह सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे त्यांचे त्यावेळी निम्म्यांहून अधिक उमेदवार बिनविरोधच निवडून आले होते. पण यावेळी मात्र सर्व विरोधी पक्षांनी हिरीरीने भाग घेऊनही शेख हसिना यांच्या सरकारचे दणक्यात पुनरागमन झाले आहे.भारतासाठी ही एक चांगली बाब आहे. कारण त्यांचे सरकार सेक्युलर तत्त्वप्रणालीचे जोरदार समर्थन करणारे सरकार आहे. इस्लामिक बहुसंख्याक असलेला हा देश पूर्णपणे सेक्युलर भूमिकेत असल्याने भारताची डोकेदुखी बर्‍याच अंशी कमी होणार आहे. सुमारे 16 कोटी लोकसंख्या असलेला हा देश पूर्णपणे भारताच्या छायेखाली आहे. या देशाची चौफर सीमा भारतीय भूभागानेच वेढली गेलेली आहे. त्यामुळे भारतासारख्या बलाढ्य देशाशी चांगले संबंध राखणे हे त्यांच्याही हिताचे आहे आणि शेख हसिना हे पूर्णपणे जाणून आहेत. त्यांच्या देशातील काही बुद्धिवाद्यांनी भारतातील मोदी सरकार हे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासणारे सरकार असल्याने, त्यांनी भारताच्या बाबतीत सावधगिरीचे संबंध राखण्याची सूचना शेख हसिना यांना सातत्याने केली होती. पण हसिना यांनी त्याकडे डोळेझाक करून भारताशी असलेले मैत्रीसंबंध कायम ठेवण्याचीच कसोशी राखली. बांगलादेश 1971 साली स्वतंत्र झाला. पाकिस्तानच्या तावडीतून भारताच्या मदतीनेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश संबंध कायम राहणे, हे अत्यंत स्वाभाविक होते. तथापि, अलीकडच्या काळात तेथील काही राजकीय पक्षांनी भारतविरोधी भूमिका घेऊन तेथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याचा शेख हसिना यांच्या यशावर काही एक परिणाम झाला नाही. या निवडणुकीत कट्टर इस्लामिक पंथीयांना तेथील मुस्लीम मतदारांनीच धूळ चारली आहे. केवळ कट्टर इस्लामिक संघटना किंवा राजकीय पक्षांशी संधान ठेवल्याबद्दल बांगलादेश नॅशनल पार्टीलाही लोकांनी साफ झिडकारले आहे. जमाते इस्लामीच्या काही उमेदवारांना बांगलादेश नॅशनल पार्टीने उमेदवारी दिली होती. ही खेळी त्या पक्षाच्या चांगलीच अंगलट आली आहे. जमाते इस्लामीचे वाढते प्रस्थ या निवडणूक निकालामुळे नाहीसे झाले आहे. त्यामुळे धार्मिक कट्टरतेचे राजकारण बांगलादेशात चालणार नाही, असा धडा मतदारांनीच तेथील राजकीय पक्षांना दिला आहे.बांगलादेशात आजही हिंदू, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्याक लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निकाल अनुकूल असाच आहे. सतत दोन वेळा सत्तेवर असलेल्या शेख हसिना यांच्या सरकारविषयी लोकांच्या मनात नैसर्गिक नाराजी असणार; याचा आपल्याला राजकीय लाभ उठवता येईल, असा अंदाज विरोधकांच्या नॅशनल युनायटेड फ्रंट या जातीयवादी फ्रंटने बांधला होता; तोही धुळीला मिळाला. या निकालामुळे बांगलादेशाला अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने शेख हसिना या पावले टाकतील असा विश्वास बाळगायला हरकत नाही. बांगलादेशाने सन 1991 पासूनच आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवले त्याचा त्या देशाला चांगला लाभ झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत त्या देशाने बर्‍यापैकी आर्थिक प्रगती साधली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.