शाळा-कॉलेज सुरु करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

0

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा, महाविद्यालये अद्याप बंद आहेत. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याबाबतचा निर्णयही शासनाने जाहीर केला. तसेच चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनही संपत आल्याने दरवर्षीप्रमाणे 15 जूनपासून शाळा सुरू होणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, शाळा- महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट केले आहे.

सर्व राज्यांना शाळा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ट्विटवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ‘केंद्रीय गृहमंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांवर अद्यापही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच शाळा, कॉलेज बंद आहेत. दोन महिन्यांपासून शाळा बंद असल्याने सर्व पालकांना शाळा पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न सतावत आहे. सोबतच लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.