रेव्ह पार्टी धाडीनंतर पोलीस तपासावर संशयाची सुई!

0

पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरात 31 डिसेंबरला रेव्ह पार्टी आयोजित करुन तरुण- तरुणी आनंदोत्सवाच्या नावाखाली हिडीस प्रदर्शन करतात. त्यात मध्यरात्री मद्यात धुंद होऊन धिंगाणा घालताना दिसून येतात. पोलिसांनी छापा टाकून धिंगाणा घालणार्‍या तरुण- तरुणींना पकडून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याच्या बातम्या आपण अनेकवेळा वाचतो, ऐकतो. परंतु ते लोण आता जळगावसारख्या शहराकडे पसरत आहे. परवा 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री जळगाव शहरालगत असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर 6 तरुणी आणि 18 तरुणांना मद्यधुंद अवस्थेत संगिताच्या तालावर धांगडधिंगा घालताना पोलिसांनी धाड टाकून रंगेहात पकडले. जळगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने रात्री 1 वाजता ही धाड टाकली. जळगाव- ममुराबाद रोडवरुन एक किलोमीटर आत शेतात अलिशान दोन मजली वातानुकुलित फार्म हाऊसमध्ये हा धिंगाणा चालला होता. त्याठिकाणी अंमली पदार्थांसह गर्भनिरोधक साहित्य सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना रात्री 3 वा. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दुसरे दिवशी 1 तारखेला दुपारी 12 वाजता त्यांना न्यायालयात न्यायाधिशांसमोर हजर करण्यासाठी न्यायालयात आणले गेले. परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यांना 4.30 वा. पुन्हा न्यायालयात नेण्यासाठी आपले पण पोलीस व्हॅन न्यायालयात न नेता क्रीडा संकुलाजवळच थांबले. त्यानंतर तेथून या सर्व संशयितांना जिल्हा रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नेण्यात आले. रात्री 7.30 वाजता न्यायाधिशांंच्या निवासस्थानी संशयितांची पोलीस व्हॅन नेण्यात आली. 24 संशयित पोलिसांचा ताफा माध्यम प्रतिनिधींचा ताफा आणि संशयित समर्थकांचा ताफा पाहून न्यायाधिशांनी संशयितांना न्यायालयात नेण्याबाबत सांगितले. 8 वाजता त्यांना न्यायालयात आणले गेले परंतु कागद पत्रातील त्रुटीमुळे न्यायाधिशांनी कामकाजास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी या संशयितांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणले आणि रात्री 9.15 वाजता पोलिसांनी पर्सनल बॉण्डवर त्यांची मुक्तता केली. कारण पोलिसांनी मुंबई अ‍ॅक्ट 110 व 117 अन्वये अदखल पात्र गुन्हा असल्याने तो गुन्हा दाखल होऊ शकत नाही तसेच त्याद्वारे त्यांना अटकही होऊ शकत नाही. म्हणून त्यांना पोलिसांनी पर्सनल बॉण्डवर त्यांना सोडून दिले. आणि दि. 2 रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. दि. 2 रोजी न्यायालयात प्रत्येक संशयिताला 1 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. अशारितीने एका गंभीर प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकून खाकी वर्दीवर शिंतोडे उडवून घेतली.
जळगावच्या उज्ज्वल अशा सांस्कृतिक वातावरणाला गालबोट लावणार्‍या या घटनेतील संशयितांना पोलिसांकडून अभय दिले गेले. राजकीय दबावामुळे पोलीस प्रशासन नमले. सर्वप्रथम पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी धाड टाकून पर्दाफाश केला याबद्दल त्यांचे अभिनंदन! परंतु त्यांचेवर करण्यात आलेल्या कारवाईच्या ढिलाईमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागला. अख्खा दिवस हातात असताना तपासाच्या कागदपत्रात त्रुटी राहतात ही बाब अत्यंत अक्षम्य आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व 24 संशयित सहीसलामत सुटले. गुन्हाच दाखल केला नसताना पोलिसांनी संशयितांना कोर्टात नेण्याचा फार्स केलाच कशाला? एकदा नव्हे, दोनदा नाही तर तीन वेळा कोर्टात नेले कशासाठी? जेव्हा आरोपींना कोर्टात नेले जाते. तेव्हा कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते हे पोलिसांना माहित नाही काय? याच प्रकरणात ते एवढे अनभिज्ञ कसे काय? या सर्व बाबी पोलिसांच्या कृत्याविषयी संशय निर्माण करणार्‍या आहेत. राजकीय दबावापुढे पोलीस हतबल ठरले असेच म्हणावे लागेल. आपल्या कतृत्वाने हिरो ठरलेले आयपीएस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांची मात्र कुचंबणा झाल्याचे स्पष्ट दिसून येते. जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक मतानी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या बैठकीवर बैठकी झाल्या त्यानंतर या प्रकरणाबाबत मुंबई अ‍ॅक्ट 110 आणि 117 लावण्याचा निर्णय झाला असावा. पोलीस अधिकार्‍यांनी दबावापोटी जरी हा निर्णय घेतला असला तरी जनता अत्यंत हुशार आहे. या प्रकरणाबाबत काय गुफ्तगु झाली, कसला राजकीय दबाव आला हे ओळखण्याइतकी सुज्ञ आहे. अशा गंभीर प्रकरणात पोलिसांची भूमिका अशी राहिली तर गुन्हेगारांना फावणार आहे. एकदा सेक्स स्कँण्डलमुळे बदनाम झालेले जळगाव पूर्वपदावर आले असताना अशा रेव्ह पार्टीमुळे पुन्हा बदनामीच्या फेर्‍यात अडकले तर त्याची जबाबदारी राजकारणी पोलीस यांचेवरच राहील एवढे मात्र निश्चित !

Leave A Reply

Your email address will not be published.