रेमडेसिवीरच्या कृत्रीम टंचाईची चौकशी करा !

0

जामनेर | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत असतांना अचानक बाजारपेठेतून रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झाल्याची बाब आश्‍चर्यकारक अशीच असून यात फार मोठे गौडबंगाल असल्याने याची चौकशी करून याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आ. गिरीश महाजन यांनी केली आहे.महाजन हे सध्या पश्‍चीम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी रवाना झालेले आहेत. मात्र तेथील व्यस्त कार्यक्रमातही ते जिल्ह्यातील कोरोनग्रस्तांच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत. बंगाल येथे रवाना होण्यापूर्वी भाऊंनी झाडाझडती घेऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेला कामाला लावले होते. याचीच दखल आज पालकमंत्र्यांना घ्यावी लागली. याचमुळे पालकमंत्र्यांना आज मोहाडी येथील हॉस्पीटलला भेट द्यावी लागली. तर दुसरीकडे गत एक-दोन दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.जळगाव जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याचे निर्देश जारी केले असले तरी मात्र बाजारातून अचानकपणे हे इंजेक्शन गायब झाले असून याची वाढीव भावाने विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची दखल घेऊन आमदार गिरीश महाजन आज आरोग्य संचालकांसह उच्च अधिकार्‍यांशी चर्चा केली. यासोबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला रेमडेसीवीर इंजेक्शनची कृत्रीम टंचाई दूर करून याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सुध्दा त्यांनी केली.कोरोनाचा प्रतिकार करण्यास महाराष्ट्र सरकारला साफ अपयश आल्याचे दिसून येत आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील स्थिती देखील अतिशय भयावह अशीच बनलेली आहे. यातच आता जीवनावश्यक इंजेक्शनची कृत्रीम टंचाई आणि यातून सुरू असणारा काळाबाजार  हा अतिशय भयावह असल्याची टीका देखील आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.