मोदींच्या सुरक्षेत त्रुटी: पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; नेमकं काय घडलं..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंजाबमध्ये नेमकं काय झालं याची माहिती पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिली. पंजाब दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी शेतकरी आंदोलकांनी रस्ता ‘ब्लॉक’ केल्यामुळे आयत्यावेळी प्रचारसभा रद्द करून माघारी परतावे लागले होते.

फिरोजपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हरवर जवळपास 15 ते 20 मिनिटे त्यांचा ताफा खोळंबला. भटिंडा विमानतळावर उतरल्यानंतर ते पुढे हुसैनीवाला येथे हेलिकॉप्टरने जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांचा ताफा रस्तेमार्गाने निघाला होता. या प्रवासात त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक निदर्शनास आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत राष्ट्रपतींनीही चिंता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनीही पंतप्रधानांना फोन केला असल्याचे कळाले आहे.

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये मोठी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये राष्ट्रपती शासन घोषित केले जावे अशी मागणी केली आहे. पंजाबमधील सगळ्या काँग्रेसविरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीबाबत नाराजी व्यक्त करत चिंता व्यक्त केली आहे.

कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच पंजाबमध्ये चालले होते. या दौऱ्यादरम्यान फिरोजपूर येथे प्रचारसभा तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम होणार होता. विमानतळावरून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करण्याच्या नियोजनात बदल करावा लागला आणि ते रस्तेमार्गाने निघाले होते. हे अंतर साधारण दोन तासांचे होते. या प्रवासात शहीद स्मारकाच्या जवळपास 30 किलोमीटर अलिकडे शेतकरी आंदोलकांनी त्यांचा ताफा रोखला.

पंतप्रधानांच्या रस्ते प्रवासाची पूर्वसूचना राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आली होती. त्यानंतरही पोलिसांनी महामार्गावरील आंदोलकांना तेथून हटवले नाही. यातून पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली. अखेर पंतप्रधानांनी नियोजित दौरा आणि फिरोजपूरची प्रचारसभा रद्द केल्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळाकडे मार्गस्थ झाला. या ‘हायव्होल्टेज ड्रामा’मुळे सुरक्षा यंत्रणांची जवळपास तीन तास तारांबळ उडाली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन पंजाब सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच सुरक्षेतील त्रुटीला जबाबदार कोण? याचा तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.