मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याची वेळ, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. यावेळी तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आता दुसऱ्याकडे देण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे तसेच शिवसेनेवर स्पष्ट शब्दात भाष्य केले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, शत्रू जरी असला तरी आपण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी बैठक घेतली.

या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. त्यांची प्रकृती बरी नाही हे जरी खरे असले तरी राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते. त्यामुळे त्यांची तब्येत ठिक नसेल तर त्यांनी आपला चार्ज कोणाकडे तरी दिली पाहिजे.

कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एकच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नका. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे.

“मी तुमच्या तब्येतीबाबत परमेश्वराकडे प्रार्थना करतो की लवकर हे बरे व्हावेत. परंतु तोपर्यंत कोणीतरी तुमच्यावतीने मुख्यमंत्री म्हणून… कारण मुख्यमंत्री या शब्दात अर्थ आहे. मुख्यमंत्री या शब्दात ताकद आहे, त्यामुळे तो लागेल आणि तो कोण असावा ते तुम्हीच ठरवायचं आहे.” असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.

मुंबै बँक अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला कस संपवत आहे यावरही भाष्य केले. राष्ट्रवादीने चेअरमन पद पदरात पाडून घेतले, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसं झालं? आता हे शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे. त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात असेही ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.