मुक्ताईनगरात रोहिणी खडसेंना उमेदवारी?

0

शाखांचा विस्तार : साम्राज्याला ओहोटी

जळगाव (प्रतिनिधी) :मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवारीचा घोळ अंतीम क्षणीही कायम असून या मतदारसंघातून ऐनवेळी नाथाभाऊंच्या ऐवजी त्यांची कन्या, जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप एकाच दगडात अनेक पक्षी घायाळ करणार आहे. यातून नाथाभाऊंच्या शाखांचा विस्तार होत असला तरी त्यांच्या एकूणच साम्राज्याला ओहोटी लागणार आहे.

नाथाभाऊ हे खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांना पहिल्या यादीत उमेदवारी न मिळाल्याने विद्रोहाची एक सुप्त लाट निर्माण झाली आहे. जाणकारांच्या मते ही भाजपतर्फे चाचपणी आहे. मोठा विद्रोह झाला तर त्यांनाच उमेदवारी जाहीर झाली असती. मात्र, उघडपणे मोठा विद्रोह दिसत नसल्याने भाजपने नाथाभाऊंना बाजूला करण्याचा मनोदय केल्याचे स्पष्ट होत आहे. यातून जो असंतोष होईल तो टाळण्यासाठी रोहिणीताईंना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

असे झाले तर नाथाभाऊ मार्गदर्शक मंडळात जातील जेथे त्यांची स्थिती लालकृष्ण अडवाणींसारखी होवू शकते. यातून देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी कमी होईल. रोहिणीताई उमेदवारी मिळून निवडूनही आल्या तर त्या नवख्या म्हणून मुख्यमंत्र्यांचे निर्विवाद वर्चस्व मान्य करतील. त्यांना सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे फिरावे लागेल. नाथाभाऊ आमदार झाले तर ते मुख्यमंत्री म्हणून प्रबळ दावेदार होतील आणि हेच फडणवीस यांना नको आहे.

एका दगडात दोन पक्षी मारणे यालाच म्हणतात. एकाच घरातील आमदार रोहिणीताई व खा. रक्षाताई असल्यावर नाथाभाऊंना पुढील पाच वर्षे शांत रहात मम म्हणावे लागेल. आणि आमदार व खासदार नवखे असल्याने ते बंडाची शक्यताच नाही. त्यांना सतत मुख्यमंत्र्यांची हाजी हाजी करावी लागेल. मुलिला मिळणारी आमदारकी नाथाभाऊ स्विकारतात का ? नाथाभाऊंनी आमदारकीसाठी हट्टच धरला तर त्यांच्या घरातच गृहकलह होण्याचे नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नाथाभाऊंचा अभिमन्यू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.