मुंब्रा-कौसामध्ये शंभर टक्के लसीकरण होणार

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांनी गुरुवारपासून (दि. 28) मुंब्रा-कौसा येथे तीन दिवसांचा ‘लस महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्धविहार यांच्या माध्यमातून जनजागृती करुन 100 टक्के लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण  यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिवहन समिती सदस्य शमीम खान हे उपस्थित होते.

मुंब्रा-कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवकांच्या माध्यमातून लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही, काही भागात लसीकरणाचा टक्का कमी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन हा लस महोत्सव आयोजित केला आहे. मुंब्रा रेतीबंदर ते कौसा-कल्याण फाटा या भागातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अमृतनगर शंकर मंदिरजवळ आणि शमीम खान यांच्या विधानसभा कार्यालयानजीक दोस्ती अपार्टमेंट, कौसा येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. गुरुवार ते शनिवार दरम्यान हे लसीकरण होणार असून गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री नऊ आणि शनिवारी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

दररोज 6 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून गरजेनुसार लसींची मात्रा वाढविण्यात येणार आहे, नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. मंदिरांमधील पुजारी, मस्जिदमधील मौलवी, चर्चमधील पाद्री, बुद्धविहारांमधील भंतेंजींच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येणार आहे; मुंब्रा-कौसा भागातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशी आमची अपेक्षा असून नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन असे शानू पठाण यांनी सांगितले. तर, शमीम खान यांनी, कौसा, वाय जंक्शन, कल्याण-शिळफाटा येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा कार्यालयानजीक दोस्ती अपार्टमेंट, कौसा येथे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन केले आहे.

या पत्रकार परिषदेला मुंब्रा प्रभाग समितीच्या सभापती दिपाली भगत, ठामपाचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, नगरसेविका आशरीन राऊत, जफर नोमानी, रुपाली गोटे, राजू अन्सारी, जावेद शेख, गणेश मुंडे, गुड्डू  आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.