मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकरांनी राखलं वर्चस्व

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सहकारी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई बँक निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी २१ जागांवर सहकार पॅनलचा विजय झाला आहे.

पूर्वी सहकार पॅनलच्या १७ जागांवर बिनविरोध निवड झाली होती तर ज्या ४ जागांवर निवडणूक लागली होती. त्या जागांवरही सहकार पॅनलचे उमेदवार जिंकले आहेत. प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँकमध्ये घोटाळा केल्याचे आरोप केल्यानंतरही एकहाती वर्चस्व मिळाले आहे. मुंबई बँक निवडणुकीत ज्या ४ जागांवर मतदान झाले होते त्याची आज मतमोजणी पार पडली आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा विजय झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या ४ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातून सहकार पॅनलमधील विठ्ठलराव भोसले यांचा विजय झाला आहे. तर प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघातून पुरुषोत्तम दळवी, महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ आणि राखीव मतदार संघातून अनिल गजरे यांचा विजय झाला आहे. अशा प्रकारे २१ पैकी २१ जागांवर प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील सहकारी पॅनलमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रावादी काँग्रेसमधील उमेदवारांचा समावेश होता. परंतु शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे ४ जागांवर निवडणूक लागली होती. मुंबई बँकेतील अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवेसनेकडून अधिकृत उमेदवार होते तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी केली असून त्यांचा पराभवही झाला आहे. शिवेसनेचे बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

मुंबई बँकेतील सहकाऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास – दरेकर

मुंबई जिल्हा बँकेवरुन अनेक लोकांनी टीका टीप्पणी केली. मुंबई बँक आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबई बँकेतील सहकाऱ्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाबार्ड, आरबीआय, सहकार खाते यांच्या निकषामध्ये बसत बँकेला प्रगतीकडे नेण्याचे काम केले यामुळे मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला १०० टक्के यश दिले आहे. अशा शब्दात दरेकरांनी विरोधकांना सुनावले आहे. मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो कारभार करण्यात आला आहे. त्या कारभारावर शिक्कामोर्तब निवडणुकीमुळे झाला असल्याचे दरेकर म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.