मातेचं हृदय असलेला महामानव…!

0

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरूजी जन्म 24 डिसेंबर 1899. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी सदाशिव साने या खोताच्या घरी जन्मलेल्या पांडुरंगवर त्यांची आई यशोदाचे फार मोठे संस्कार झालेले. प्राथमिक शिक्षण पालगड येथे झाल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्याची आर्थिक स्थिती नसल्याने औंध संस्थानात मोफत शिक्षण मिळत होते म्हणून औंधला माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. माधुकरी मागून, वार लावून प्रसंगी चणे मुरमुरे खाऊन शिक्षण घेतले. परंतु ज्ञानोपासना त्यांनी सोडली नाही.

मध्येच प्लेग महामारी आल्याने साने गुरूजींनी औंध सोडावे लागले. पुन्हा पालगडला आले. तेथे घरची आर्थिक घडी काही सुधारलेली नव्हती. पुढच्या शिक्षणाला ते पुण्याला गेले. 1918 साली ते मॅट्रिक झाले. त्यानंतर पुढचे पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यावेळचे न्यू पूना आणि आताचे एस.पी. कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन एम.ए. इंग्रजीची पदवी प्राप्त केली. त्याचवेळी खान्देशातील अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात फेलोची जाहिरात निघाली होती. त्यानुसार ते अमळनेर तत्वज्ञान मंदिरात रूजू झाले. परंतु त्यांनी ती फेलोशिप सोडून देऊन अमळनेरच्याच प्रताप विद्यामंदिरात शिक्षकाची नोकरी धरली. तेे विद्यार्थी वस्तीगृहाचे ते प्रमुख झाले. त्यांचे विद्यार्थ्यांशी नाते जडले. 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले.

गुळाभोवती जसे मुंगळे चिटकतात त्याप्रमाणे शिक्षकाभोवती विद्यार्थी जमले पाहिजेत. तरच तो खरा शिक्षक होय अशी त्यांनी शिक्षकाविषयी विचार मांडले आहेत. साने गुरूजी यांचा जन्म कोकणातला असला तरी त्यांची कार्यभूमी ही खान्देशची विशेषत: अमळनेर ही आहे. त्यामुळे खान्देशवासीयांना त्यांचा अभिमान असायलाच हवा.

1920 पासूनच त्यांचेवर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रभाव झालेला होता. म. गांधींवर त्यांची नितांत श्रध्दा होती. 1936 साली झालेले फैजपूरचे पहिले ग्रामीण भागातील काँग्रेसे अधिवेशन यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या अधिवेशनात स्वातंत्र्याची ज्योत त्यांचेच हस्ते आणण्यात आली. 1938 साली त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यात स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात प्रबोधन करण्याचे कार्य केले. 1932 पासून साने गुरूजींना सातत्याने तुरूंगवास भोगावा लागला. 1932 ते 1945 या कालावधीत ब्रिटिशांनी त्यांना सतत तुरूंगात 1932 साली धुळे तुरूंगात विनोबा भावेंबरोबर गुरूजीही होते. विनोबाजींनी धुळे तुरूंगात दिलेल्या गितेवरील प्रवचने ऐकून गुरूजींनी पुस्तक रूपाने प्रसिध्द केले. नासिक तुरूंगात असतांना सुप्रसिध्द श्यामची आई ही कादंबरी त्यांनी लिहिली. श्यामच्या आई या पुस्तकाच्या आतापर्यंत शेकडो आवृत्त्या निघाल्या. आजही श्यामची आई विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतेय. गुरूजीनी विपुल असे साहित्य निर्माण केले. त्यांच्या नावावर एकूण 73 पुस्तके आहेत.

साने गुरूजी 25 जानेवारी 1899 ते 11 जून 1950 एवढे 51 वर्षच जगले. हा कालावधी अत्यंत कमी असला तरी तो जाज्वल्य असा आहे. एखादी व्यक्ती किती वर्षे जगतो त्यापेक्षा तो कसा जगतो याला महत्व आहे. दुसऱ्या प्रकारात साने गुरूजी मोडतात. 51 वर्षापैकी शिक्षण घेण्याचे 25 वर्षे आणि शिक्षणानंतरचे 25 वर्षे असे दोन भाग त्यांच्या जीवनाचे करता येतील. विद्यार्थी दशेत सुध्दा ते फक्त शिक्षण एके शिक्षणच घेत होते असे नाही. ते नेहमी समाजाचा, देशाचा विचार करीत असत. त्यांचे साहित्य प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कष्टकऱ्यांची सुध्दा त्यांच्यात तळमळ होती. आता उठवू सारे रान या त्यांच्या कवितेतून शेतकरी आणि कष्टकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बडव्यांकडून दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यासाठी त्यांनी 27 दिवसांचे उपोषण सुरू केले. अखेर दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश खुला झाला. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाचे दर्शन खुले केले असे म्हटले जाऊ लागले. 1945 ला तुरूंगातून सुटल्यानंतर साने गुरूजी गप्प कसे बसतील? त्यांनी 15 ऑगस्ट 1948 ला पुण्याहून साधना साप्ताहिक सुरू केले. त्यातून प्रबोधनाचे कार्य सुरू केले. आज साधना साप्ताहिकाचे रूपांतर साधना मासिकात झालेले आहे.

साने गुरूजींवर समाजवादी विचाराचा पगडा होता. भारतीय स्वातंत्र्यानंतर भाषावाद प्रांत रचनाची निर्मिती झाली. परंतु भाषावार प्रांतामुळे देशाच्या अखंडतेवर परिणाम होतोच असे साने गुरूंजींना जाणवले म्हणून त्यांनी आंतर भारतीची स्थापना केली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा त्यांचा संदेश त्या काळात महत्वपूर्ण ठरला. त्यांनी या निमित्ताने संपूर्ण भारतभर दौरे करून प्रांताप्रांत निर्माण होणारे भेद मिटवावेत आपण सर्व भारतीय आहोत. हा संदेश आंतरभारतीच्या निमित्ताने दिला गेला. याच कालावधीत महाराष्ट्रात त्यांनी सेवादलाची स्थापना केली. या सेवादलाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर एका विचाराने प्रेरीत असलेल्या युवकांची संघटना निर्माण झाली. सेवादलाच्या माध्यमातून, सेवादलाच्या कलापथकाच्या माध्यमातून मानवधर्म हाच खरा धर्म असल्याचा प्रचार आणि प्रसार केला गेला. सेवादलाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे संघटनेचे कार्य करायचे. या सेवादलातूनच साने गुरुजी, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, दादा गुजर, अमळनेरचे वा. रा. सोनार, मृणाल गोरे, ग.प्र. प्रधान आदींसारखे एका विचाराने झपाटलेले तरुण निर्माण केले.

गुरूंजींवर प्रेम करणारा फार मोठा वर्ग होता. स्वातंत्र्यानंतर 30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींची गोळ्या झाडून एका महाराष्ट्रीय तरुणाने हत्त्या केली. गुरूंजींच्या मनावर याचा फार मोठा परिणाम झाला. गांधीजींच्या निर्वाणानंतर गुरूजी जिवंत असून मरणच जगत होते असे म्हणतात. परिणामी 11 जून 1950 रोजी गुरूजींनी स्वत: आपली प्राणज्योत मालवून घेतली. अशाप्रकारे मातेप्रमाणे समाजावर, देशावर, शेतकरी, कष्टकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या महामानवाचा अंत झाला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Leave A Reply

Your email address will not be published.