महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ला; दाट जंगलात आढळला मृतदेह

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडली आहे. या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे (वय ४३ ) असे आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात स्वाती ढुमणे गेल्या होत्या.

प्रकल्पाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ९७ मध्ये ही घटना घडली आहे.  स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.९७ येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत ४ वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने अधिक कुमक बोलावली गेली. ही माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी -अधिक कुमक आल्यावर शोधमोहिमेत मृतदेह सापडला.

सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने Transect line survey चे काम केले जात आहे. सकाळी ७  वाजता कोलारा भागात याच कामासाठी पथक पोचले होते. मात्र ४ किमी आत गेल्यावर रस्त्यावर असलेल्या वाघामुळे पथकाने मार्ग बदलला. मात्र वाघाने मजुरांमागून चालत असलेल्या स्वाती यांना लक्ष्य केले. वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

वरीष्ठ वनाधिकारी कोलारा येथे दाखल झाले असून पीडित परिवाराला योग्य ती मदत दिली जात आहे. ताडोबाच्या कोअर भागातील Transect line survey चे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.