महिला बचतगटांद्वारे उत्पादित दर्जेदार वस्तूंचे ब्रॅण्डिंग करावे – श्री अंकित

0

बचतगटांच्या ‘नवतेजस्विनी’ महोत्सवाचे उद्घाटन

जळगाव:-  महिला बचतगटांद्वारे तयार करण्यात येत असलेल्या वस्तु या दर्जेदार असतात. त्यांच्या विक्रीसाठी आकर्षक पॅकिंग करून ब्रॅण्डिंग करावे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आज येथे व्यक्त केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम )जिल्हा कार्यालयामार्फत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ‘नवतेजस्विनी’ महोत्सवाचे उदघाटन श्री.अंकित यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्रीकांत झाम्बरे, अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रणव झा, सारस्वत बँकेचे सौरभ उपस्थित होते.

श्री.अंकित म्हणाले,महिला बचतगटांनी उत्पादित वस्तूंसोबत आवश्यक परवान्यांवर भर द्यावा. विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बचतगटांनी एकत्र येऊन गुणवत्तेवर भर द्यावा. जेणेकरून बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच फक्त प्रदर्शनापुरते स्टॉल न लावता कायम स्वरूपी बाजारपेठ मिळावी. यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा.

श्रीकांत झाम्बरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना नाबार्डच्या योजनांची माहिती दिली. प्रणव झा यांनी बँकेच्या अडचणीबाबत महिलांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन महिलांसोबत चर्चा केली.

या प्रदर्शनात ३० बचतगटांनी स्टॉल लावले असून यात हस्तकलेच्या वस्तू , केळी वेफर्स, केळी पिठ ,बिबडी,पापड, खान्देशी मसाले, हळद, सफेद मुसळी पावडर, आवळा कँडी, मुखवास, विविध चटण्या, पुरणपोळी, कढी फूनके,पाणी पुरी, पुजा साहित्य इ.वस्तूचा समावेश आहे. १४ डिसेंबर पर्यंत हे डॉ.शानबाग सभागृहात हे प्रदर्शन चालणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुमेध तायडे यांनी केले. सूत्रसंचालन व्यवस्थापक जयश्री खोपडे यांनी केले. आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी माविम लेखाधिकारी विजय कुमार स्वामी, सहायक सनियंत्रण अधिकारी युवराज पाटील, उपजिविका विकास अधिकारी प्रशांत पाटील, लेखा लिपिक दिपक वाणी यांनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.