महामार्गाच्या १०० कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात

0

आ.सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश : पहिल्या टप्प्यात होणार काम

जळगाव, दि.१४ : शहरातून जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. आ.सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात जळगाव बायपास व समांतर रस्त्याचे १६.८६ किलोमीटरचे काम सुरु करण्यात येणार आहे.  केंद्रीय परिवहन, रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी जळगाव शहरातून जात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणासह जिल्ह्यातील विविध कामांचा शुभारंभ केला होता. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आ.सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांनी पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.

        आ.भोळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासह कॉंक्रीटीकरण व समांतर रस्ते करण्याच्या १०० कोटींच्या कामाला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील १६.८६ किलोमीटरच्या कामासाठी निधी वर्ग करण्यात आला असून त्याबाबत ‘नही’च्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी जळगाव शहरातील महामार्गाच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल आ.सुरेश भोळे(राजूमामा) यांनी त्यांचे आभार मानले आहे.

वरणगाव शहरातील कामांचाही समावेश

‘नही’कडून वरणगाव शहरातून जात असलेल्या ६.२३ किलोमीटरच्या महामार्गाचे चौपदरीकरण आणि उड्डाणपूल उभारणीसाठी ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. जळगाव शहरातील १०० कोटींचे काम आणि वरणगाव शहरातील ३० कोटींचे काम अशी एकूण १३० कोटींची कामे करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.