मनुदेवी संस्थान फसवणूक प्रकरणी बाबा महाहंस महाराजला ४ दिवसांची पोलिस कोठडी

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील आडगाव येथील सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या जागा नसल्याचे भासवून बनावट कागदपत्र तयार करून नवीन ट्रस्टच्या नावाने जागा हडप करून संस्थानची फसवणूक करणाऱ्या संशयित बाबा महाहंस महाराज यास आज येथील न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती एम.एस.बनचरे यांनी हा आदेश दिला. संशयित बाबा महाहंस महाराज विरुद्ध येथील पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रकाश मार्तंड पाटील उर्फ बाबा महाहंसजी महाराज यांनी सातपुडा निवासीनी श्री. मुनदेवी मंदीर सेवा प्रतिष्ठानची जागा वनविभाग कक्ष नं. १४९ गट नं. ३५३ मध्ये ०.२४ आर ही जागा ही वनविभागात येते. परंतू बाबा महाहंस यांनी सदरची जागा वनविभागाची असल्याचे माहिती असतांना बनावट दस्तऐवज तयार केले, आणि ही जागा मंदीराची नसल्याचे दाखवून त्या ठिकाणी नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट या नावाने नव्याने संस्था स्थापन करून फसवणूक केली.

यासंदर्भात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार आणि न्यायालयाच्या आदेशान्वये संशयित बाबा महाहंस महाराज यांच्यावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनूदेवी संस्थानचे सचिव निळकंठ डिगंबर चौधरी यांनी सांगितले, की वनविभागाच्या मालकीची जागा १९९१ पासून ही सातपुडा निवासीनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानच्या मंदीराच्या विकासासाठी ही ०.२४ आर जागा वनविभागाने दिली होती. याबाबत सर्व पुरावे व नोंदणी संदर्भात कागदपत्रे संस्थाकडे आहे. असे असतांना संशयित बाबा महाहंस महाराज यांनी बनावट कागदपत्रे तयार करून नवीन मुनदेवी चॅरिटेबल स्ट्रस्ट नावाने संस्था स्थापन करून मनुदेवी संस्थानची फसवणूक केली असल्याचे सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.