भुसावळच्या चौधरी बंधुंचे असेही राजकारण !

0

जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ मतदार संघ 2009 साली मागास वर्गीयांसाठी राखीव झाला अन्‌ माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राजकारणाचे वासे फिरले. भुसावळ नगरपालिकेत सत्ता असताना संतोष चौधरी आणि त्यांचे लहान बंधु अनिल चौधरी हे एकत्र होते. भुसावळ नगरपालिकेतील सत्ता भाजपच्या ताब्यात गेली आणि संतोष चौधरी आणि अनिल चौधरी यांनी वेगळ्या पक्षाचा घरोबा केला वर्षभरापूर्वी  अनिल चौधरी भाजपचे म्हणविले जात होते. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणून ते वावरत होते. त्यावेळी संतोष चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. 2019 च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षांतर्फे निवडणुक लढण्याची इच्छा प्रकट केली होती. जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात तसे जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी माशी कुठे शिंकली हे कळले नाही. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून संतोष चौधरीच्या नावावर फुली मारली गेली अन्‌ संतोष चौधरींचे नाव मागे पडले. राष्ट्रवादीकडे  ॲड. रविंद्र पाटील यांच्या नावाला पहिली पसंती होती. परंतु रविंद्र पाटलांनी निवडणुक लढण्यास नकार दिल्यामुळे रावेरसाठी शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नसल्याने रावेर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील आणि भाजपच्या रक्षा खडसे यांच्यात लढत होऊन अपेक्षेप्रमाणे भाजपच्या  रक्षा खडसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. युती धर्म म्हणून राष्ट्रवादीत असलेले संतोष चौधरी यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना जे सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही हे विशेष.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भुसावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सतिष घुले यांची उमेदवारी  संतोष चौधरींनी जाहीर केली होती. परंतु ऐनवेळी येथेही माशी शिंकली आणि ही जागा मित्रपक्ष रिपार्इ गटाचे  जगन सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. जगन सोनवणे यांनी पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होताच संतोष चौधरींचा संताप अनावर झाला. त्यांनी  अपक्ष उमेदवार डॉ. मधु मानवतकर यांना आपला पाठींबा जाहीर केला. मधु मानवतकर या अपक्ष  उमेदवाराच्या प्रचारात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील  आदीसह अनेक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. स्वत: संतोष चौधरी यांचा मधु मानवतकर यांच्या प्रचार फलकावर मोठा फोटो टाकण्यात आला आहे,  हे विशेष. चांगल्या  उद्देशाला साथ द्या, विकासाला  आशिर्वाद द्या, असे आवाहन  प्रचार फलकाद्वारे करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जगन सोनवणे यांना मात्र वाऱ्यावर सोडले गेले.

संतोष चौधरी यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे त्यांचे कट्टर  विरोधक भाजपाचे  संजय सावकारे यांचा मार्ग मोकळा झालाय. हे संतोष चौधरींना कळत नाही असे म्हणावे काय?  वर्षभरापूर्वी भाजपात असलेले संतोष चौधरी बंधू अनिल चौधरी हे मागील निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीत एरंडोल- पारोळा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यावेळी निवडणूक न लढता त्यांनी माघार घेतली होती. यावेळी  वर्षभरापासून यावल- रावेर मतदार संघात निवडणुक लढण्याच्या उद्देशाने गावोगावी दौरे केले भाजपतर्फे उमेदवारी मिळेल ही त्यांना अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. अनिल चौधरीच्या  प्रचारार्थ मोठे बंधू संतोष चौधरी हे मैदानात उतरले आहेत. या दोघा चौधरी बंधुंवर रावेर मतदार संघातील मतदार विश्वास टाकतात की त्यांच्या विश्वासाला तडा देतात हे 24 तारखेला निवडणुक निकालातून स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.