भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन धावत असताना चार ते पाच डबे रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती आहे.

पश्चिम बंगाल राज्यातील मोयनागुडी रेल्वे स्थानकाच्या जवळ हा अपघात झाला. ट्रेन क्रमांक 15633 बीकानेरहून गुवाहाटीकडे जाताना सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास (साधारण 4 वाजून 53 मिनीटे) हा अपघात घडला.

अपघाताबाबत प्राप्त माहिती अशी की, अपघात घडला तेव्हा ट्रेनचा वेग साधारण प्रती तास 40 किलोमीटर होता. ट्रेन रुळावरुन धावत असताना अचानक झटका बसला आणि डबे रुळावरुन खाली घसरले. यात जवळपास तीन डबे उलटले. अपघात इतका भयावह होता की, डबे अक्षरश: एकमेकांवर चढले. एका डबयावर दुसरा डबा चढल्याने खालचा डबा दबला गेला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), राजकीय रेल पोलीस, (जीआरपी) आणि स्थानिक अपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले.

प्रशासकीय आणि रेल्वे जवानांसह स्थानिक नागरिकांनीही मदत आणि बचाव कार्यास हातभार लावला. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समजू शकली नाही. रेल्वे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. आगोदर ट्रेनचे इंजनच उलटले आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. दरम्यान, मृतांची आणि जखमींची संख्या समजू शकली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.