भाजप अजूनही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार !

0

नांदेड: राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप अजूनही शिवसेनेसोबत तयार आहे, असं विधान भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.नांदेडे येथे मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मुनगंटीवार यांनी केलेल्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून सत्तेमध्ये भाजप काहीही करण्यास तयार असल्याचीही टीका मुनगंटीवार यांच्या विधानानंतर होत आहे.

शिवसेना पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे सारे काही विसरून शिवसेनेने भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्यास ‘सुबह का भुला श्याम को लौट आया’ असे समजून आम्ही त्याचा विचार करू. त्यास भाजपकडून कोणतीच आडकाठी असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा संसार सुरळीत चालला असला तरी भाजप मात्र त्यामुळे अस्वस्थ असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात भाजपला सत्तेबाहेर राहिल्यानेच ही अस्वस्थता असून त्यातूनच अनेक नेते खासगीत भाजप-शिवसेना युती व्हायला हवी, अशी कुजबूज खासगीत करत आहेत. आता मुनगंटींवार यांच्या विधानाने तो दबका आवाजच बाहेर आल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्त्यावर प्रतिक्रिया देत मुनगंटीवार म्हणाले, “शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे. अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.