बैलगाडी विहिरीत पडून बैलासह शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बामणोद  येथे  एका शेतमजूराचा आणि बैलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त गेल्यानंतर, शेतमजूर बैलगाडीसह विहिरीत कोसळला आहे. यामध्ये बैलाचा आणि शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय ६५)  असं मृत शेतमजुराचं नाव आहे. मृत सोनवणे हे यावल तालुक्यातील बामणोद येथे वास्तव्याला होते. दरम्यान, मृत सोनवणे हे गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास बामणोद शिवारात शेतात काम करण्यासाठी गेले होते. मध्य रात्रीच्या काळोखातून जात असताना, त्यांना शेतातील विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बैलगाडीसह विहिरीत कोसळले.

या दुर्दैवी अपघातात शेतमजूर विश्वनाथ सोनवणे यांच्यासह बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. सोनवणे यांच्यासह बैलाच्या नाका तोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर फैजपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.