प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखनौ पोलिसांनी कलम 144 आणि कायदा व सुवस्थेचा हवाला देत प्रियंका यांना ताब्यात घेतले आहे. प्रियंका यांना पोलीस लाईनमध्ये घेऊन जाण्यात येत आहे.

आग्रा येथे पोलीस कोठडीमध्ये सफाई कर्मचारी अरुण वाल्मिकी या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आग्र्याच्या एसएसपीने पाच पोलिसांवर कारवाई करत त्यांना निलंबीतही केले आहे. याच प्रकरणी अरुण याच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी रवाना झाल्या होत्या. मात्र लखनौ पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले. प्रियंका यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून योगी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

दरम्यान, अरुण वाल्मिकी याचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये झाला आहे. त्याचे कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. मला वाल्मिकी कुटुंबियांची भेट घ्यायची आहे. उत्तर प्रदेश सरकारला कशाची भीती वाटतेय? मला का रोखले जात आहे? असा सवाल प्रियंका गांधी यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

जगदीरपुरा पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या भागात शनिवारी रात्री चोरी झाली होती. चोरांनी 25 लाखांचा माल लंपास केला होता. या प्रकरणी अरुण वाल्मिकी या सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. यावरुन उत्तर प्रदेशमधील राजकारण ढवळून निघाले असून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

अरुण वाल्मिकी याचा मृतदेह बुधवारी सकाळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला तेव्हा तिथे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सपाचे राष्ट्रीय महासचिव रामजीराल सुमन, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राघवेंद्र सिंह मिनू, बीएसपी आणि भीमआर्मीचे कार्यकर्ते यावेळी येथे जमा झाले होते. तसेच सफाई कर्मचारी युनियनचे पदाधिकारीही येथे आले होते. पाहता-पाहता जमाव आक्रमक झाला आणि अरुण याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष राघवेंद्र सिंह मिनू यांना मारहाण करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.