प्रशासकीय निवड समिती अद्यापही अंधारातच! भाग 18

0

बुरशीयुक्त शेवयांचे प्रकरण : अहवालावर कारवाईच नाही

जळगाव, दि. 29 –
जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणार्‍या शेवयांचे प्रकरण खदखदत असताना हा पुरवठा करणार्‍या ठेकेदारावरील कारवाईसाठी अद्यापही मुहूुर्त सापडत नसून प्रशासनाने नेमणूक केेलेली निवड समिती या संपूर्ण प्रकरणी अंधारात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा विषय जिल्हा परिषदेच्या चर्चेचे गुर्‍हाळ होत असताना देखील त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे.

अहवालावर कारवाई शून्य
या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांची रँडम पद्धतीने चौकशी करण्यात आली असून त्यांच्या प्राप्त अहवालावर अद्यापही कारवाई होत नसल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रकार असल्याची चर्चा जि.प वर्तुळात आहे. अहवालावर कारवाई व्हावी अशी मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणाने जिल्हा परिषदेचा नावलौकीक धुळीस मिळविला असताना देखील प्रशासनाने या प्रकरणाकडे जातीने लक्ष दिले नसल्याने यात काहीतरी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होवू लागला आहे. शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी तक्रार करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराचा उर भरुन आला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपाने तर ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा विडा उचलला असून विरोधकांनी देखील तोंडावर बोट ठेवल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.