पुरवठा थांबवून ठेकेदारावर होणार गुन्हा दाखल

0

बुरशीयुक्त शेवया प्रकरणी सभेत खडाजंगी : जिल्हा परिषदेच्या सभेत अधिकारी धारेवर, सभागृहात झळकला लोकशाही
जळगाव, दि. 21 –
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथे आढळलेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी झाली. अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी सदस्यांनी लावून धरली. संबंधीत ठेकेदाराकडून होत असलेला पुरवठा थांबवून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. दै. लोकशाहीने प्रकाशित केलेली वृत्तमालिका यावेळी सभागृहात दाखविण्यात आली.
जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, नानाभाऊ महाजन, प्रभाकर सोनवणे, प्रताप पाटील, रवींद्र देशमुख यांनी बुरशीयुक्त शेवया प्रकरणी प्रश्‍न उपस्थित करीत अधिकार्‍यांना धारेवर धरले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी व अधिकार्‍यांना दै. लोकशाहीचे अंक सादर करुन सांगितले की, पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बुरशीयुक्त शेवयांची पॉकीटे आढळून आली असून जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांच्या रँडम पद्धतीची चौकशी देखील करण्यात आली, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून संबंधीत ठेकेदारावर अद्यापही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. महिला व बालविकास अधिकारी रुबाब तडवी यांनी शासनाला सादर केलेला अहवाल हा तकलादू असून त्यात ठोस कारवाई करण्याचा कुठलाही मुद्दा नाही. अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला.
उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन म्हणाले की, गेल्या सभेत संबंधीत ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला असताना देखील त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? जिल्ह्यातील अन्य अंगणाड्यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असताना देखील कारवाई करण्यास टाळाटाळ होत असून अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी सूचना त्यांनी मांडली त्याचे सदस्यांनी स्वागत केले. सदस्य रावसाहेब पाटील म्हणाले, बालकांच्या पोषण आहाराबाबत संवेदनशील नसलेल्या ठेकेदारावर त्वरीत कारवाई होणे क्रमप्राप्त आहे, सभागृहाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव केल्यानंतरही अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. नानाभाऊ महाजन म्हणाले, रँडम पद्धतीच्या चौकशीतही ठेकेदार दोषी आढळला असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई का करण्यात येत आहे? जिल्ह्यात पुरवठा करण्यात आलेल्या शेवया ह्या बुरशीयुक्त असून त्या धोकेदायक आहेत, ठेकेदाराने पुरवठा केलेला माल हा खाण्यायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले असतानाही ठेकेदाराला कुण्याच्या आशिर्वादाने वाचविण्यात येत आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला.
अहवाल सभागृहात सादर
बुरशीयुक्त शेवया प्रकरणी सदस्य संतप्त झाल्यानंतर त्यांनी शासनाला पाठविलेला अहवाल सभागृहात सादर करण्याची जोरदार मागणी केली. यावेळी अधिकारी रुबाब तडवी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदस्य अधिकच संतप्त झाले. अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरल्यानंतर हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. त्यावर जोरदार चर्चा झाल्यानंतर ठेकेदाराकडून होत असलेला पुरवठा थांबवून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव करण्यात आला.
पुन्हा अहवाल सादर करा : दिवेकर
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सांगितले की, शासनाला पाठविलेला अहवाल संदिग्ध असेल तर पुन्हा नव्याने अहवाल पाठविण्याची सूचना केली. जि.पच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार ठेकेदारावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचा ठराव शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले.
… तर तुमच्यावर कारवाई करु : महाजन
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन म्हणाले की, सभागृहाने केलेल्या ठरावानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला त्वरीत पाठवावा, यात होत असलेली दिरंगाई गंभीर असून असा प्रकार पुन्हा झाला झाला तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी तडवी यांना उद्देशून दिला.
कॅमेरा जप्त करण्याचा प्रयत्न
दरम्यान, सभेचे वृत्तसंकलन करण्यासाठी दै. लोकशाहीचे फोटोग्राफर गेले असता त्यांचा कॅमेरा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला. उपाध्यक्ष महाजन यांच्या या कृत्याचा फोटोग्राफर संघटनेने निषेध केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.