पावसाचा हाहाकार; चिपळूण शहर गेलं पाण्याखाली

0

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अतिमुसळधार पावसाचा मोठा तडाखा कोकणाला बसला असून रत्नागिरी जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील  चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. चिपळूणमध्ये बस स्थानक पाण्याखाली गेलं असून अक्षरश: बस पाण्यात बुडाल्या आहेत. तर, चिपळूण नगरीत स्वागताची कमानही पाण्यात बुडालेली दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ  व्हायरल होत आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.

 

समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो, हा आजवरचा अनुभव आहे. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. गुरुवारी मात्र अस्मानी संकटाने कहर केला. रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला.

चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला. चिपळूणमधील गावात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, बस स्थानकातील बस पूर्णपणे पाण्यात बुडून गेल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच, शहरातील अनेक ठिकाणच्या चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.