पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. यातच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे काही दिवसांपूर्वीच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनाच्या नंतर राज्य मंत्रीमंडळातील सुमारे २० मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांना सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज दुपारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आज एका निवेदनाच्या माध्यमातून ना. गुलाबराव यांनी आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे जाहीर केले आहे. यात ना. पाटील यांनी नमूद केले आहे की, मला कोणतीही तीव्र लक्षणे आढळून आलेली नसून माझी प्रकृती ही पूर्णपणे बरी आहे. चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर मी होम क्वारंटाईन झालो असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या सर्व जणांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.