परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध; १,३४९ जणांची यादी तयार

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ओमिक्रॉनच्या धास्तीने रायगड जिल्हा प्रशासनाने परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. मुंबईनंतर रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक १ हजार ३४९ इतकी आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांना शोधून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करीत आहे. आतापर्यंत यातील एकही नागरिक कोरोनाबाधित आढळलेला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

कोरोना नियंत्रणात येत असताना ओमिक्रॉनचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्‍न करत आहे. परदेशातून आलेल्यांचा शोध घेऊन ते बाधित असतील, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर त्या व्यक्ती कोणाकोणाच्या संपर्कात येत आहेत, याकडेही आरोग्य विभागाचे लक्ष आहे. दोन डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यात १ हजार ३४९ परदेशी नागरिक आले आहेत. यामध्ये पर्यटकही आहेत. सर्वाधिक ५९४ परदेशी पनवेल महापालिका क्षेत्रात वास्तव्य करून आहेत. त्या खालोखाल माणगावमध्ये १५०, महाडमध्ये १०५ नागरिक असून यामध्ये बहुतांशः नागरिक आखाती देशात नोकरी करणारे भारतीय आहेत.

“परदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी व त्यांना गृहविलगीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येत आहे. आतापर्यंत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचादेखील शोध घेण्यात येत आहे.”

–डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड

परदेशातून आलेले नागरिक

अलिबाग- २९, खालापूर-४४, महाड-१०५, माणगाव-१५०, म्हसळा-७०, मुरुड-६३, पनवेल ग्रामीण-११६, पेण-२०, पनवेल नगरपालिका- ५९४, पोलादपुर-३, रोहा-३५, श्रीवर्धन-८३, उरण-९, कर्जत-१९, तळा- ९, एकूण- १,३४९

Leave A Reply

Your email address will not be published.