नाथाभाऊंचा अभिमन्यू !

0

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल 125  उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. त्यात भाजपाचे ज्येष्ट नेते एकनाथराव खडसे यांचे नाव नव्हते. परंतु त्याआधी एकनाथराव खडसेंनी मोठ्या धाम- धुमीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नसल्याने समर्थक  कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत होता. कार्यकर्त्यांनी नाथाभाऊंच्या घरासमोर ठिय्या मांडून निषेध नोंदविला. पहिल्या यादीत  नाव नाही म्हणजे हा एकप्रकारे  आपल्या नेत्याचा अपमान असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते. परंतु दुसऱ्या यादीत  नाव येर्इल ही एक आशा सर्वांनाच होती. परंतु आज जाहीर झालेल्या भाजपाच्या दुसऱ्या यादीतही नाथाभाऊंचे नाव नसणे म्हणजे नाथाभाऊंचे तिकीट कापले गेले हे निश्चित.

एकनाथराव खडसेंच्या  बाबतीत भाजपकडून  असा निर्णय येर्इल हे अपेक्षितच होते. कारण साडेतीन वर्षापूर्वी नाथाभाऊंना मंत्रीमंडळातून काढल्यानंतर त्यांना भाजपतर्फे सार्इडॅक करण्यात आले. न्या. झोटींग समितीच्या निर्दोष  निर्णयानंतरही फडणवीसांनी मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. उलट जळगाव जिल्ह्यातील भाजपमध्ये फूट पाडून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना प्रमोशन दिले गेले. शेवटीशेवटी गिरीश महाजन यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीही केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाथाभाऊंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली गेली त्याचे श्रेय नाथाभाऊंचे नसून रक्षा खडसेंचेच आहे. बाकी महाराष्ट्रातील  लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांना दूरच ठेवले गेले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत गिरीश महाजन यांचा सक्रिय सहभाग होता. या यात्रेतच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची  जबाबदारी सोपविल्याचे जाहीर करुन नाथाभाऊंना जणू धक्काच दिला. त्यानंतर भुसावळला पत्रकार परिषदेत नाथाभाऊ ज्येष्ठ नेते असून त्यांना राज्यात ठेवायचे की केंद्रात घ्यायचे हा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतेच घेऊ शकतात असे सूचक विधान करुन नाथाभाऊंचा पत्ता फडणवीसांनी तेव्ंहाच कट केला होता. त्याआधी भाजपच्या कोअरकमेटीत गिरीश महाजनांना घेऊन नाथाभाऊंच्या जखमेवर मीठ चोळले होते. नाशिक येथे पंतप्रधान नद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा भव्य समारोप झाला. त्या समारोप सभेत व्यासपीठावर नाथाभाऊंना पहिल्या लार्इनमध्ये परंतु एका कोपऱ्यात स्थान दिले होते. त्या सभेत मोदींसमोर महाराष्ट्रातील दुय्यम नेत्यांना भाषण करण्याची संधी दिली गेली. पण नाथाभाऊंनी मात्र फक्त श्रोत्याची भूमिका पार पाडली. शेवटी जाता जाता पंतप्रधान नद्र मोदींना हस्तांदोलन करण्याची कशीबशी संधी मिळाली. 40 वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहिलेल्या खडसेंनी जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात  भाजप वाढविण्यासाठी मात्र जिवाचे रान केले. एवढे मात्र निश्चित. परंतु गेल्या साडेतीन वर्षांचा नाथाभाऊंचा कार्यकाळ आणि घटनाक्रम पहाता नाथाभाऊ पक्षाशी एकनिष्ठ राहिले हे विशेष. या  मागचे कारण म्हणजे भाजपाकडून नाथाभाऊंना  फार काही मिळाले. त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले गेले. भाजपचे गटनेतेपद दिले गेले. 6 वेळा आमदारकी दिली. सुनेला खासदारकी मिळाली. पत्नीकडे  जिल्हा दूध संघाबरोबरच महाराष्ट्र राज्य दूध फेडरेशनचे अध्यक्षपदही आले.मुलगी रोहिणी जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेची चेअरमन झाली. साखर कारखाना, सूतगिरणी या संस्थां त्याच्याकडे आहेत. त्यामुळे नाथाभाऊंना पक्षाकडून काही मिळाले आहे. त्यामुळे आता पक्ष जो निर्णय घेर्इल त्यांचा नाथाभाऊंना आदर करणे क्रमप्राप्त आहे.

मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या नाथाभाऊंचे मग चुकले कुठे? 2014 च्या निवडणुकीनंतर एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मुख्यमंत्री होण्यासाठी वकुब लागतो तो त्यांच्याकडे होता. विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्यांनी  पाच वर्षे  गाजवले होते.  सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा अनुभव  आणि अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे आणि तिथेच पहिला फटका बसला. अभ्यासू अनुभवी ज्येष्ठ नेता म्हणून फडणवीसांच्या मंत्रीमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांचेकडे 12 खाती दिली गेली. या सर्व खात्याचा दीड वर्षे त्यांनी गतीमान कारभार केला. हे सर्व करीत असताना मुख्यमंत्र्यांच्या विषयी बोलण्याचे भान मात्र नाथाभाऊंना राहिले नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना नडला. त्यातच पुण्याच्या भोसरी एमआयडीसीतील जमीन प्रकरण निघाले. त्यात त्यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. व्यतिरिक्त  कुख्यात डॉन दाऊदच्या बायकोशी संभाषण केले असलेचेे कथित आरोप तसेच त्यांच्या पीएनी मागितली 30 कोटीची खंडणी आदींचा ससेमिरा नाथाभाऊंचे मागे लावण्यात आला. या सर्व आरोपात त्यांचे जरी निर्दोषत्व सिद्ध झाले. परंतु  त्यानंतर विधानसभेत आपल्याच सरकारच्या विरोधात जे भाषण केले ते त्यांना नडले. नाथाभाऊंना या सर्व गोष्टी पक्षीय पातळीवर सोडविल्या पाहिजे होत्या. तसे न करता विधानसभा गृहाच्या व्यासपीठावरुन  जे तडाखेबाज भाषण केले त्यातून  नाथाभाऊंचे समाधान  झाले असले फडणवीसांना ते आवडले नाही. या भाषणामुळे विरोधी पक्षांना मात्र फावले आणि भाजप पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसला. त्यामुळे  पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही  हे आवडले नाही. त्याचा फटका नाथाभाऊंना सोसावा लागत आहे. भाजपने नाथाभाऊंचा अडवाणी केला असे म्हणतात. परंतु पंतप्रधान नद्र मोदींच्या हृदयात अडवाणींविषयी आदराचे स्थान  आहे. म्हणूनच मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले तेव्हा लोकसभागृहात झालेल्या कार्यक्रमात अडवाणी व जोशींना मानाचे स्थान दिले होते. त्यामुळे नाथाभाऊंकडूनही काही चुका झालेल्या आहेत त्याचाच परिणाम आज ते चक्रव्युहात अडकले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.