नागरिकांनी अतिवृष्टीमध्ये घराबाहेर पडू नये

0

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनांनुसार दि. 18 जुलै 2021 रोजी रायगड जिल्हयासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मागील 24 तासांमध्ये सरासरी 186.51 मि.मी.पावसाची नोंद झालेली आहे. महाड तालुका वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये 120 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडला असल्याने जिल्हयातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झालेले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अतिवृष्टीमध्ये घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन अतिवृष्टीमुळे उठवलेल्या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून इंडियन कोस्ट गार्ड व स्थानिक बचाव पथके तत्पर ठेवण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाच्या पूर्वसूचनांकडे दुर्लक्ष करुन काही नागरिक मासेमारीसाठी व धबधबे, नदी किनारी, तलावाच्या ठिकाणी पोहण्यासाठी जात आहेत. त्यामुळे दुर्घटना घडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणच्या घटनांमध्ये 3 व्यक्ती बेपत्ता असून त्यांचे शोध कार्य सुरु आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) मौजे मेदडी ता.म्हसळा सुरेश हरेश कोळी वय 42 वर्षे हा मासेमारीसाठी खाडीमध्ये गेला असता बोट उलटल्याने बेपत्ता आहे. शोध कार्य सुरु आहे.

2) मौजे देवपाडा गाव ता.कर्जत येथे प्रमोद जगन जोशी, वय 26 वर्षे पोशीर नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला असून स्थानिक प्रशासनाकडून शोध व बचाव कार्य सुरु आहे.

3) मौजे पोयंजे येथील पाली बुद्रुक डॅमवर पोहण्यासाठी दिपक गंभीरसिंग ठाकूर, वय 24 रा.कळंबोली गेला असता बेपत्ता झालेला आहे.स्थानिक प्रशासनाकडून शोध कार्य सुरु आहे.

त्याचप्रमाणे जिल्हयातील दोन पशूधनाची जीवितहानी झालेली आहे. यामध्ये 1 बैल व 1 म्हशीचा समावेश आहे.

जिल्हयातील पेण तालुक्यातील तांबडशेत, दूरशेत, जिते अशा विविध सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झालेले आहे. मौजे बळवली-दूरशेत ता.पेण येथील 20 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. मौजे चुनाभट्टी ता.पेण येथील 80 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

महाड शहरातील दस्तुरीनाका येथे पाणी भरले आहे. अंबा नदीची पाणी पातळी वाढल्याने नागोठणे बसस्थानक, बाजारपेठेच्या परिसरामध्ये पाणी भरले आहे. पनवेल, उरण तालुक्यातील काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले आहे. तथापि जिल्हयातील पूर परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सर्व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या. सुकेळी खिंड ता.रोहा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. जे.सी.बीच्या सहायाने दरड हटविण्याचे काम तात्काळ सुरु केले आहे. वडवली-दिघी रस्त्यावर पावसामुळे माती रस्त्यावर आली होती. ही माती हटविण्याचे काम सुरू केले आहे. माथेरान जुमापट्टी येथे दरड कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. ही दरड हटवून रस्ता मोकळा करण्यात येत आहे. मौजे राजपूरी ता.मुरुड येथे व मौजे दूरशेत ता.पेण येथे काही घरांवर दरड कोसळून घरांचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मौजे माडप ता.खालापूर येथे रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली होती. वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यिात आली असून दरड हटविण्यात येत आहे.

या सर्व परिस्थितीमध्ये वाहतूक व्यवस्थेकडेही लक्ष ठेवण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक संथगतीने सुरु होती. रेल्वे वाहतूकही सुरु होती. सध्या पाली पूलावरुन पाणी जात असल्याने पाली पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. सुकेळी खिंडीत महामार्गावर मुंबई मार्गिकेवर दरड कोसळली होती. ती हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जिल्हयातील प्रमुख महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गावरील वाहतूक सुरु आहे.

भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचनांनुसार दिनांक 23 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्हयातील नागरिकांनी सतर्क राहून स्वत:ची व इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, अतिवृष्टीचे प्रमाण विचारात घेवून वेळीच सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जावे. तसेच अतिवृष्टीच्या वेळी धबधबे, तलाव, गड/किल्ले, नदी/समुद्र किनाऱ्यावर अतिउत्साहामध्ये जावून नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.