नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्याला समर्पित: पंतप्रधान नरेंद्र मोदी (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा १० वा हप्ता जारी केला. दहा कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २० हजार कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

पीएम-किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. मोदींनी सुमारे ३५१ शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) १४ कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान जारी केले ज्याचा एक लाख २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “नववर्षाची सुरूवात देशाच्या अन्नदात्यांसोबत करणं हा आपला सन्मान आहे. आज प्रत्येक भारतीयाची शक्ती भारताचा कायापालट करत आहे आणि देशाच्या विकासाला नवी गती आणि ऊर्जा देत आहे. आज आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर आठ टक्क्यांहून अधिक आहे आणि विक्रमी विदेशी गुंतवणूक भारतात आली आहे. भारताने थेट विदेशी गुंतवणूक, जीएसटी संकलन आणि निर्यातीत अनेक विक्रम केले आहेत. भारताने २०२१ मध्ये ७० लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार केले आहेत”.

पंतप्रधान पुढे म्हणाले, “गेल्या सात वर्षांत सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. लहान शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत”.

माता वैष्णो देवी येथे झालेल्या भीषण अपघातातील मृतांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “केंद्र सरकार जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. मी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशी या घटनेबद्दल बोललो. मदतकार्य सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत”.

Leave A Reply

Your email address will not be published.