थेट कारवाई करण्यास प्रशासन धजावेना! भाग -11

0

बुरशीयुक्त शेयवांचे प्रकरण : ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न

जळगाव, दि. 20 –
जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त प्रकरणी प्रशासन थेट कारवाई धजावत नसल्याने या प्रकरणाचे धागेदोरे मोठ्या प्रमाणावर पसरले असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न अर्थपूर्ण असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.

                                                                       प्रशासन गंभीर नाहीच!
बालक, महिलांना पुरवठा होणार्‍या घरपोहच आहार योजनेत बुरशीयुक्त शेवया आढलल्यानंतरही प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेतलेली नाही. चौकशीचा सोपस्कार पूर्ण करण्यात प्रशासन वेळ मारुन नेत आहे. रँडम पद्धतीच्या चौकशीत केवळ वेळ खर्ची घालण्यात आलेला आहे. आता या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असताना देखील कारवाईचा फार्स ठरलेला नाही एकूणच या प्रकरणी प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप होत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत विद्यार्थ्यांना बुरशीयुक्त शेवयांचे होणारा पुरवठा जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी पुरव्यानिशी समोर आणल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शंकेची पाल कुचकुचत आहे. धुळे येथील ठेकेदाराने या बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले असताना देखील प्रशासन केवळ चौकशीचा फास आवळण्याचा दिखावा करीत आहे. गेल्या महिनाभरापासून याा प्रकरणी चालढकल होत असताना देखील लोकप्रतिनिधी देखील तोंडावर बोट ठेवून आहे. धुळ्यातील भाजपा पदाधिकार्‍याकडे हा ठेका असून स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी ठेकेदाराला वाचविण्याचा जणू विडाच उचललेला आहे. जिल्ह्यातील पंधरा अंगरवाड्याच्या रँडम पद्धतीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही अद्यापही कारवाईचा फार्स आवळला जात नसल्याने प्रशासन गंभीर नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी विशेष सभेत या प्रकरणी आवाज उठविल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल असे अशावासन देण्यात आले होते. मात्र चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. लोकप्रतिनिधींच्या चिडीचूप प्रकारामुळे या प्रकरणात कुणा-कुणाचे हात पिवळे झाले हे समोर येणे आवश्यक झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.