अहवालावरुन अधिकार्‍यांचे अंगुलीनिर्देश! भाग -10

0

बुरशीयुक्त प्रकरणाची खदखद : अहवालप्राप्तीनंतरही तोंडावर बोट

जळगाव, दि. 18 –
जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवयांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही त्याची गोपनीयता पाळून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम सुुरु असून अधिकारी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत असून ठोस कारवाईसाठी अद्यापही मुहूर्त सापडत नाही.
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा घरपोहच आहाराबद्दल शंका उपस्थित होत असता देखील या प्रकरणी गोपनीयता पाळून हा विषय दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासकीय पातळीवरुन सुरु असून माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांच्या रँडम पद्धतीच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला असताना देखील त्यावर कारवाईसाठी जिल्हा परिषदेला अद्यापही मुहूर्त सापडत नसून यात काही तरी काळेबेरे असल्याची शंका निर्माण झाली आहे. पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील प्रकरणानंतर जिल्हा परिषदेने कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली असली तरी या प्रकरणी अद्यापही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ठेकेदाराला वाचविण्यासाठी जिल्हा परिषदेने कावाईचा हात आखता घेतला असून या प्रकरणात कोण दबाव टाकत आहे हे सर्वश्रृत असताना देखील अधिकार्‍यांनी हाताची घडी तोंडावर बोट अशीच भूमिका निभावली आहे. बालक व महिलांना सुदृढ करण्यासाठी प्रशासन लाखो रुपये खर्ची घालत असून त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. बुरशीयुक्त प्रकरणी थेट गुन्हा दाखल होवून ठेकेदारावर कारवाई अपेक्षित असताना देखील त्याच्या कृष्णकृत्याला खतपाणी घालण्याचेच काम प्रशासनाकडून होत असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जोर धरीत आहे.

अधिकार्‍यांची मिलीभगत
या सार्‍या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तीबद्दल अधिकार्‍यांनी सावध भूमिका घेतली असून ठेकेदाराला सरळसरळ पाठीशी घालण्याचे प्रयत्न चालविले आहे. जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी सबळ पुराव्यानिशी तक्रार दिली असताना देखील अधिकारी मिलीभगत करुन दोषींना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून स्वतंत्र्य चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.