शेवया प्रकरणावरुन सत्ताधार्‍यांमध्ये दोन गट!-12

0

कारवाई करण्याचा सेनेचा हट्ट : भाजपाचा सावध पवित्रा

जळगाव, दि. 21 –
अंगणवाड्यांमधील बुरशीयुक्त शेवयांनी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन केली असून ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी शिवसेनेने हट्ट धरला असून भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. या गटा-तटाच्या राजकारणामुळे मात्र सत्ताधारी भाजपाने सावध पवित्रा घेतला असून हा पवित्रा ठेकेदारासाठी दिलासा देणारा ठरत आहे. दुसरीकडे मात्र शिवसेना कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम असून प्रशासनाच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहे.

तात्काळ कारवाईचा हट्ट
भाजप पदाधिकार्‍यांमध्ये या बुरशीयुक्त शेवयांच्या माध्यमातून खटके उडण्यास सुरुवात झाली असून तात्काळ कारवाई करण्यात पूर्व परिसरातील पदाधिकार्‍यांनी आग्रह धरला असून काही पदाधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत.

पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत बालकांना पुरवठा करण्यात येणार्‍या शेवयांना बुरशी लागल्याचे निदर्शनास आल्यानंतरही प्रशासन ठोस कारवाई करण्यास अद्यापही धजावत नसल्याने सर्वस्तरातून संतापाची लाट उसळत आहे. धुळे येथील ठेकेदाराने या बुरशीयुक्त शेवयांचा पुरवठा केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने सुरुवातीपासून लावून धरली असून भाजपाने मात्र सावध पवित्रा घेतल्याने त्यांच्या या भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली आहे. ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी भाजपामधील दुसरा गट देखील आग्रही असून सत्ताधार्‍यांमध्येच दोन गट पडल्याने येथे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची खमंग चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. सत्ताधारी भाजपा पदाधिकार्‍यांनी सुरुवातीला हे प्रकरण तडीस जाईल असा विश्‍वास सर्वांनाच दिला मात्र वरिष्ठ पातळीवरुन दबाव आल्यानंतर त्यांनीही कारवाईचा आखडता हात घेत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु केला असून दुसरा गट मात्र कारवाई करण्यावर ठाम असून त्यांच्यात रोजच खटके उडत अहेत. संबंधित ठेकेदार हा भाजपचा पदाधिकारी असल्याने शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे प्रयत्न तोडक ठरत आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे मात्र ठेकेदाराला अच्छेदिन तुर्त तरी आले आहे असेच म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.