निवड समिती अध्यक्ष अनभिज्ञच! भाग -13

0

बुरशीयुक्त शेवया प्रकरण : अहवालावरील मंथन संपेना

जळगाव, दि. 22 –
जिल्हा परिषदेच्या अगंणवाड्यांमध्ये पुरवठा झालेल्या बुरशीयुक्त शेवया प्रकरणी अद्यापही कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसून या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनभिज्ञच असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील रँडम पद्धतीची चौकशी झाली असून त्याच्या अहवालावर अजूनही मंथन करण्यातच जिल्हा परिषद प्रशासन वेळ खर्ची घोलत आहे.

प्रशासन मंथनात गुंग
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी जिल्ह्यातील पंधरा अंगणवाड्यांच्या रँडम पद्धतीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर हे अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून त्यावर अद्यापही मंथन करण्यातच जि.प धन्यता मानत आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबेवडगाव येथील अंगणवाडीत बालकांना पुरवठा करण्यात आलेल्या शेवया बुरशीयुक्त आढळून आल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाईची चालढकल सुरुच आहे. धुळे येथील ठेकेदाराकडून या शेवयांचा पुरवठा झाला असून निविदा प्रक्रिया राबवितांना देखील या ठेकेदाराची राजकीय पद्धतीने निवड झाल्याचे समोर येत आहे. निवड समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर हे या प्रकरणी संपूर्णत: अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी उघडकीस आलेल्या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असून ठोस कारवाई करण्यास अद्यापही मुर्हूत सापडत नाही. जिल्हाधिकारी हे घरपोहच आहार योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष असून यात अनियमितता आढळून आल्यास वा काही चुकीचा पुरवठा झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे. जिल्हा परिषद सदस्या रेखा राजपूत यांनी पुराव्यानिशी तक्रार करुनही जिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष मात्र कारवाई करण्यास धावत नसल्याचे समोर आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.