तेव्हा मी मुख्यमंत्रीपद ब्राह्मणाला दान म्हणून दिलं ; खडसेंची फडणवीसांवर टीका

0

जळगाव – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्य़ेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. एका कार्यक्रमात दोघांमधील वादाचं कथन करताना  ‘मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं,” असं विधान खडसे यांनी मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

हा नाथाभाऊ दिलदार आहे. नाथाभाऊ तुम्ही आता घरी बसा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं मला सांगितलं गेलं. त्यावर मी म्हटलं की, मी भल्याभल्यांना दान देतो. मग एका ब्राह्मणाला दान द्यायला काय हरकत आहे. एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला टाकण्यात आले. त्याच व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. अशा लोकांमुळेच मला भाजपा सोडावा लागला, अशी टीकाही एकनाथराव खडसे यांनी फडणवीसांवर केली.

आपण भाजपा का सोडली याच कारण सांगताना खडसे म्हणाले, “भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा.”

“मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली.

Leave A Reply

Your email address will not be published.