तिकीट तपासणी अधिकारी भासवून प्रवाशांकडून हजारो रुपयांची वसुली

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

अमळनेर रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी  अहमदाबाद हावडा नवजीवन एक्सप्रेसमध्ये एका इसमाने  तिकीट अधिकाऱ्याची वेशभूषा परिधान करून प्रवाशांना भीती दाखवत हजारो रुपये घेऊन पोबारा केला. प्रवाशांनी संबंधित घटनेची माहिती जळगाव स्थानकावर पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

या घटनेबाबत प्रवाशांनी  लोकशाहीला कथन केली आपबिती.. 

अहमदाबाद हावडा एक्सप्रेसच्या इंजिन मागील D२ डब्यात अमळनेरमध्ये टिटीईचा कोट परिधान केलेल्या त्या इसमाने मी रेल्वे टी.टी आहे असे सांगत नागरिकांना तिकिटाची विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी काही प्रवाशांचे टिकीट वेटिंग  होते तर काही प्रवाशी विनातिकीट होते. सदर त्या इसमाने मी तिकीट अधिकारी असल्याचे सांगितले व तुम्हाला दंड भरावा लागेल असे धमकावून सांगितले. आणि दंड भरण्यासाठी पैशांची मागणी केली.  रेल्वे डब्यात बऱ्याच  प्रवाशांनी घाबरत त्याला पैसे काढून दिले.

कोणी २०० रुपये तर कोणी ५०० रुपये दिले, त्या  घेतलेल्या पैशांची कुठल्याही प्रकारे पावती प्रवाशांना दिलेली नाही. तसेच काही नागरिकांनी दंडाची पावती मागितली, मात्र त्या तिकीट अधिकाऱ्याच्या वेशभूषेत असलेल्या त्या इसमाने सक्त नकार दिला. त्याचप्रमाणे काही डब्यातील सुज्ञ नागरिकांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली. आपण खरोखर तिकीट अधिकारी आहात का असा जाब विचारला.

त्यावेळी काहींनी त्याला आपले ओळखपत्र दाखवा असे देखील सांगितले. या गोष्टीचा राग आला मी रेल्वे तिकीट अधिकारी आहे.  तुम्हाला शासनाच्या कर्मचाऱ्याला असे काही विचारण्याचा अधिकार नाही. तुम्ही मला ओळख पत्र विचारणारे कोण? माझ्याशी नीट बोला, तुम्हाला माझे ओळखपत्र मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. मी तुमच्या सगळ्यांवर कारवाई करेल असे दमदाटी करत सगळ्यांना धमकावले. अशाच प्रकारे त्या डब्यातून पैसे उकळत पुढे गेला आणि अमळनेर स्टेशन वरच गाडी सुरू होताच चालू गाडीतून उतरून पोबारा केला.

अमळनेर ते जळगाव नेहमीप्रमाणे अप डाऊन करणाऱ्या काही तरुणांना देखील हेच विचारले, की तुमचे तिकीट दाखवा मग त्या तरुणांनी देखील त्याला प्रश्न केला की, आपण कोण आहात आणि आपले ओळखपत्र दाखवावे. या बाबतीत गोंधळ निर्माण झाल्याने तर काही तरुण प्रवाशांनी  खिशातून मोबाईल काढला त्या इसमाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोटो काढते वेळी आपली मान फिरवून फोटो निघणार नाही याची काळजी घेतली.

अमळनेर स्थानकावरून रेल्वे निघाली आणि तो चालत्या रेल्वेत खाली उतरत व विरुद्ध दिशेने चालत गेला. यावेळेस रेल्वे चालत असताना या विषयाची त्या डब्यात पूर्णपणे चर्चा झाली.  सदर इसम कोण असावा? हा प्रश्न प्रवाशांना पडला.  तासभरात रेल्वेने जळगाव स्टेशन गाठले. याप्रसंगी प्रवाशांनी दैनिक लोकशाहीशी संपर्क साधत सगळी माहिती सांगितली.  यासंदर्भात दैनिक लोकशाहीने रेल्वे आरपीएफ स्थानकात जाऊन अधिकाऱ्याशी संपर्क साधत त्यांना त्या फोटोतील त्या तिकीट अधिकाऱ्याच्या वेशभूषेत असलेल्या व्यक्तीचा फोटो बाबत विचारपूस केली असता पुढील चौकशी आणि तपास करत आहोत. व त्यावर नक्कीच कारवाई करू असे देखील रेल्वे आरपीएफने सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.