डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन उत्साहात

0

 

जळगाव : मुंबई येथील विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावरील सिनेमाचे प्रमोशन उत्साहात मू.जे.महाविद्यालयात बुधवारी पार पडले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कला शाखेचे उप प्राचार्य डॉ. सुरेश तायडे, चित्रपटाचे निर्माते विराग वानखेडे उपस्थित होते. यावेळी चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्यात आला. चित्रपटात डॉ. लहाने यांचे भूमिकेत मकरंद अनासपुरे असून अलका कुबल, रमेश देव, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात केतकी माटेगावकर, साधना सरगम यांचे गायन असून सोबत खान्देशातील २५ गायक कलाकरांचा समावेश आहे. यात मू.जे.महाविद्यालयाचा गायक प्रज्ञाचक्षू स्व.तेजस नाईक याचाही आवाज आहे.

विराग वानखेडे यांचे नावावर ४ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. या सिनेमाच्या कमाईतून ते मोफत नेत्रालय औरंगाबाद आणि मुंबई येथे सुरु करणार आहेत. डॉ. लहाने यांच्या गरीब परिस्थिती ते नामवंत नेत्रतज्ञ पर्यंतचा प्रवास सिनेमात आहे.

यावेळी विराग वानखेडे म्हणाले की, अंध व्यक्तींना होणारा त्रास मी अनुभवला. पाहिला. डॉ. लहाने यांचे कार्य समजून घेतले. त्यानंतर त्यांचेवर सिनेमा बनविला आहे. मुंबई येथे नवकलावंताना मोठ्या प्रमाणात वाव असून विद्यार्थ्यांनी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनतीवर भर दिला पाहिजे, असे सांगून त्यांनी तेजस नाईकच्या स्मृतीला उजाळा दिला.

डॉ. सुरेश तायडे यांनी, विद्यार्थ्यांमध्ये जर जुनून असेल तर ध्येयप्राप्तीसाठी तो खूप प्रयत्न करतो असे सांगत विराग वानखेडे यांचे कौतुक केले. नेत्रदानासाठी प्रभावी कार्य उभे राहिले पाहिजे असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. विश्वजीत चौधरी यांनी केले. यावेळी चित्रपटाचे सेट डिझायनर आशिष विसपुते, मिथुन पासवान, किशोर हिवाळे, भूषण पाटील, किरण वसाने यांचेसह इव्हेंट विभाग प्रमुख पंकज कासार, संगीत विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगाणे, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख हेमंत पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.