“टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजवे हाताचा जोर जास्त असतो”

0

ताराबाई शिंदे या मूळच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील होत्या. त्यांचे वडील बापूजी शिंदे ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील एक कार्यकर्ते होते. त्यामुळे लहानपणापासूनच ताराबाई शिंदे यांच्यावर ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता.

ताराबाई शिंदे या एकोणिसाव्या शतकातील स्त्री-पुरुष समानतेविषयी मांडणी करणाऱ्या पहिल्या मराठी स्त्रीवादी लेखिका. त्यांचे १८८२ साली लिहिलेले स्त्री-पुरुष तुलना हे मराठीतील पहिले लेखन आहे ज्यात एका स्त्रीने निर्भीडपणे आणि परखड शब्दांत समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन व स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायासंबंधी पुरुषांना सरळ-सरळ प्रश्न विचारले. या पुस्तकातून विधवा पुनर्विवाहावरील बंधने, स्त्रियांची कुटुंब आणि समाजातील दुय्यम स्थान व स्त्रीला दैनंदिन जीवनात भोगावे लागणारे अन्याय अशा अनेक प्रश्नांची मांडणी करून पुरुषसत्ताक व्यवस्थेला आव्हानच दिले.

‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाच्या संदर्भात ‘विजयालक्ष्मी केस’ हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सुरत येथील विजयालक्ष्मी ही ब्राह्मण कुटुंबातील विधवा स्त्री गरोदर राहिली आणि समाजाचा दबाव आणि भीतीमुळे तिला गर्भपात करावा लागला. यावर सूरत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. परंतु तिने मुंबई न्यायालयात अपील केल्यामुळे पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली. दरम्यान या केससंबंधीच्या स्त्रीजाती विरोधातील बातम्या वृत्तपत्रातून छापून आल्या. यामुळे स्त्रियांच्या विरोधातील टीकेचे वातावरण समाजामध्ये निर्माण झाले, त्यामुळे या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून लिहिल्या गेलेल्या ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या लेखनाला विजयालक्ष्मीची केस एक महत्त्वाचे निमित्त ठरते.

या केसविषय मांडणी करताना ताराबाई शिंदे म्हणतात, “रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांचे गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले. त्यामुळे मला निर्भिड होऊन असेच खणखणीत शब्दात लिहल्या वाचून राहवेना.” बाईचे पाऊल ‘वाकडं’ पडतं याला पुरूषच बहुधा जबाबदार असतात, असा युक्तिवाद करताना त्या म्हणतात, “टाळी एका हाताने वाजत नाही, पण त्यातून उजव्या हाताचा जोर जास्तच असतो.” या निबंधात त्यांनी स्त्रियांना दिले जाणारे सारे दोष स्त्रियांपेक्षा पुरुषांतच कसे जास्त आहेत आणि काही स्त्रियांत असे दोष आढळले तरी ते पक्षपाती, अनिष्ट रूढींमुळे आणि प्रचलित पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळेच कसे निर्माण झाले आहेत हे परखडपणे मांडले आहे.

ताराबाईंचे हे विचार आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू आहेत असे म्हणल्यास गैर ठरणार नाही.

(संदर्भ: विलास खोले संपादित स्त्री-पुरुष तुलना)

दिपाली कांबळे

समन्वयक – सम्यक

Leave A Reply

Your email address will not be published.