जानकीनगरातील नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा ओघ

0

जळगाव, दि.2 –
शहरातील जानकी नगरात लागलेल्या आगीत जवळपास 20 ते 22 पार्टीशनची घरे जळून खाक झाल्याची घटना काल दि.1 रोजी घडली होती. आगीच्या घटनेचा तहसिलदारांकडून आज पंचनामा करण्यात आला. या आगीत सर्व गमावलेल्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. घटनास्थळी जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांनी भेट देवून पिडीत कुटुंबियांची चर्चा केली. ना. महाजन यांच्याकडून प्रत्येक कुटुंबियांना 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे आ. चंदुलाल पटेल,आ. राजुमामा भोळे, महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक कैलास सोनवणे आदी उपस्थित होते.
जानकी नगरातील पार्टीशनच्या घरांना लागलेल्या आगीत खाक झालेल्या कोळशाच्या ढिगार्यातून विखुरलेल्या काही वस्तु, साहित्य व आठवणींना शोधण्याचा प्रयत्न करतांना दुसर्या दिवशी दिसून आले. अवघ्या एका तासाच्या आगीत संसाराची राखरांगोळी झालेल्या कुटुंबियांनी अख्खी रात्र संसाराच्या आठवणींमध्ये जागून काढली. चिमुकले देखीही रात्रभर झोपले नसल्याची नुकसानग्रस्त कुटुंबियांनी सांगितले.अनेक संसार उध्वस्त झाल्याने येथील रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात करण्यात आली होती. तसेच जानकीनगरातील काही रहिवाश्यांनी पिडीत कुंटुंबियांना राहण्याची व्यवस्था करून दिली होती. युवाशक्ती फाउंडेशन, निस्वार्थ सेवा प्रतिष्ठान, रेडक्रॉससह अनेक सामाजिक संस्थाच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी जावून कपडे व जेवनाची व्यवस्था केली होती. तर काही युवाशक्ती फाउंडेशनकडून येथील रहिवाश्यांना भांडी दिली. यासह अनेक नागरिकांनी देखील वैयक्तिक मदत करून येथील रहिवाश्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार अमोल निकम यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. तसेच येथील घरांचे दुपारी उशिरापर्यंत पंचनामे करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.