प्राथमिक सुविधांसाठी समतानगरवासियांचा मोर्चा

0

जळगाव :
गेल्या 35 वर्षांपासून रहिवास असला तरी प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या समतागनर परिसरातील रहिवाशांनी शुक्रवार, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला.
समतानगर परिसरातील वस्ती 2 फेब्रुवारी 1982 पासून वसलेली असून या भागात सोयी-सुविधांचा अभाव आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखील शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घोषणांनी दणाणला परिसर
समतानगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चादरम्यान मागण्यांबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा पोहचल्यानंतर तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी अनिल अडकमोल यांनी मार्गदर्शन केले तसेच रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या.
कर भरतो तर सुविधा का नाही?
या भागातील रहिवासी महापालिकेचे सर्व कर भरतात तसेच येथील वस्ती अधिकृत असली तरी सुविधा मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनीदेखील मनोगत व्यक्त करून विविध मागण्या केल्या. यानंतर जिल्हाधिकाजयांना निवेदन देण्यात आले.
या आहेत मागण्या
जागेचा 7/12 उतारा मिळावा, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे त्याच ठिकाणी घरकूल बांधून मिळावे, उद्योग-व्यवसायासाठी मुद्रा योजनेंतर्गत प्रत्येक स्त्री-पुरुषास कर्ज मिळावे, केसरी कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत स्वस्त धान्य मिळावे, समतानगरला जाण्यासाठी मुख्य रस्ता तयार करावा, या मागण्या करण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.