जाणून घ्या.. हरतालिका पूजा कशी करावी

0

भारतीय संस्कृतीत देवाची उपासना आणि व्रतांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचप्रमाणे हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो.

आज देशभरात हरतालिका साजरी केली जाणार आहे. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.

हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.

पूजेचा मुहूर्त

भाद्रपद शुक्ल तृतियेला आज हरतालिकेच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त सकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत चांगला मुहूर्त आहे तर प्रदोष काल हरितालिका व्रत पूजा मुहूर्त हा सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 51 मिनटांपर्यंत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्तीचं (पिंडीचं) विसर्जन करून महिला हा व्रत पूर्ण करतील.

पूजा विधी

या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. घरामध्ये एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर विडा मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.

पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असा आहे: बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी.

कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते खावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.

हरतालिकेची कहाणी

हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. मात्र, पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. ती इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.

हरतालिका आरती

जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥ पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥ माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

 

Leave A Reply

Your email address will not be published.