चक्क.. वडापावला सोन्याचा झळाळी..! किंमत वाचून चक्रावून जाल..

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे वडापाव.. ही बाब सर्वश्रुत आहे. एकदाही वडापाव खाल्ला नाही, अशी व्यक्ती मुंबईत सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण वडापाव हा मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि नाक्यावर मिळतो. वडापावची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे हा खाद्यप्रकार सामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र, हाच वडापाव 2000 रुपयांना मिळत असेल तर. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे प्रत्यक्षात घडले आहे.

सध्या सोशल मीडियावर सोन्याचा वर्ख असलेल्या वडापावची काही छायाचित्रे व्हायरल होत आहेत. हा वडापाव संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) O,Pao नावाच्या हॉटेलच्या मेन्यूमध्ये आहे. या वडापावची किंमत 99 दिरहम म्हणजे तब्बल 2000 रुपये इतकी आहे. हा जगातील पहिला गोल्ड प्लेटेड वडापाव असल्याचा दावा हॉटेलने केला आहे. यामध्ये वड्याला 22 कॅरेटच्या सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. वडा तयार करण्यासाठी ट्रफल बटर आणि चीज स्टफिंग वापरण्यात आले आहे.

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. opaodxb या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.